पणजीतील धूळप्रदूषणाचे प्रकरण
पणजी, २७ मार्च (वार्ता.) : शहरातील ‘स्मार्ट सिटी’च्या दृष्टीने चालू असलेल्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होत आहे. त्याला अनुसरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात २ जनहित याचिका प्रविष्ट झालेल्या आहेत. यावर न्यायालयात सलग दुसर्या दिवशी म्हणजे २७ मार्च या दिवशीही सुनावणी झाली. सुनावणीच्या वेळी खंडपिठाच्या न्यायाधिशांनी १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार असल्याचे म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने २६ मार्च या दिवशी सुनावणीच्या वेळी ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लि.’ ही संस्था आणि तत्सम संस्था यांना ‘खोदकाम करतांना धूळप्रदूषण रोखणे, तसेच रस्ता सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, नागरिकांची होणारी गैरसोय रोखणे यादृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या ?’, असे प्रश्न केले होते. प्रतिवादी पक्षाने २७ मार्चला सध्या चालू असलेल्या ‘स्मार्ट सिटी’च्या कामांविषयी माहिती खंडपिठाला दिली. सरकारने ‘स्मार्ट सिटी’ची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन खंडपिठाला दिले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी एप्रिल मासात होणार आहे. खंडपिठाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे २८ मार्च या दिवशी निरीक्षण करण्याचा आणि धूळप्रदूषणासंबंधी माहिती गोळा करण्याचा आदेश दिला आहे. ‘धूळप्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या ? याविषयी माहिती द्यावी’, असेही आदेशात म्हटले आहे.
(सौजन्य : Prime Media Goa)
‘स्मार्ट सिटी’च्या कामांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसची पणजी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात तक्रार
पणजी : तृणमूल काँग्रेसने ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे आयुष हळर्णकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून प्रथम श्रेणी न्यायालयात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, न्यायालयाने उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक आणि पणजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना ‘स्मार्ट सिटी’चे पदाधिकारी, पणजी महानगरपालिकेचे महापौर अन् आयुक्त यांच्या विरोधात प्रथम दर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्याचा आदेश द्यावा.