उपसरपंच उल्हास मोरजकर अपात्र
पणजी, २७ मार्च (वार्ता.) : सांगोल्डा पंचायतीचे उपसरपंच उल्हास मोरजकर यांनी १६ लाख १० सहस्र रुपयांचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाल्याने पंचायत संचालनालयाने त्यांना उपसरपंच पदावरून हटवण्याचा आदेश दिला आहे, तसेच मोरजकर यांना पंचायत सदस्य म्हणूनही अपात्र ठरवले आहे. त्यांना १९ मे २०२६ पर्यंत निवडणूक लढवता येणार नाही. आता पंचायतीच्या प्रभाग ७ मध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.
सांगोल्डा येथील नागरिक आनंद तुळसकर यांनी उपसरपंच उल्हास मोरजकर यांच्या विरोधात १८ ऑगस्ट २०२३ या दिवशी पंचायत संचालनालयाकडे तक्रार नोंदवली होती. ही तक्रार पंचायत मंडळाच्या वर्ष २०१७ ते २०२२ या कार्यकाळात घडलेल्या आर्थिक घोटाळ्याशी निगडित आहे. या कार्यकाळात ७ एप्रिल २०२१ ते १८ जून २०२२ या कालावधीत उपसरपंच उल्हास मोरजकर हे तेव्हा सरपंचपदी होते. तक्रारदाराच्या मते, उल्हास मोरजकर यांनी मे २०२१ ते जून २०२२ या कालावधीत मनमानी पद्धतीने पंचायत निधीचा वापर केला.
१६ एप्रिल २०२१ या दिवशी पंचायतीने एक ठराव घेऊन पंचायतीचे अधिकोषातील खाते पंचायतीचे तत्कालीन सरपंच उल्हास मोरजकर यांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला; मात्र उल्हास मोरजकर यांनी ३४ वेळा अधिकोषातून मनमानीपणे पैसे काढले.
पंचायतीच्या सचिवांनी या प्रकरणी १६ लाख १० सहस्र रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. उल्हास मोरजकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. संबंधित रक्कम पंचायतीच्या कामासाठीच वापरल्याचा त्यांनी दावा केला आहे; मात्र यासंबंधी ठोस पुरावे ते सादर करू शकले नाहीत. पंचायत संचालनालयाने दोन्ही बाजू ऐकून उल्हास मोरजकर यांना उपसरपंच पदावरून हटवून त्यांना पंचायत सदस्य या नात्याने अपात्र ठरवले आहे.