ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।।
– ईशावास्योपनिषद, मंत्र १
अर्थ : या जगातील प्रत्येक अणू-रेणूमध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे. तेव्हा त्यागी वृत्ती (संयम) ठेवून जगाचा उपभोग घे. (आपल्या उन्नतीसाठी (प्रभुकार्यासाठी) कार्य कर); परंतु त्याच वेळी कुणाच्या धनाची अभिलाषा बाळगू नकोस.
‘साधकाची चित्तशुद्धी व्हावी’, याकरता यजुर्वेदात जे तत्त्वज्ञान वेदांत या स्थितीदर्शक शब्दाने गौरवले आहे, त्या ‘ईशावास्य’ उपनिषदाचा हा पहिला श्लोक. ‘सामान्य माणसाने ईशमार्गाने कसे जगावे’, याचे कर्म-सैद्धांतिक वर्णन यात मांडले आहे आणि याचे उद्गाते आहेत महर्षि याज्ञवल्क्य ! अथांग सागरासारखे विस्तीर्ण असे महर्षि याज्ञवल्क्य यांचे जीवनचरित्र शब्दांत बांधणे अशक्य आहे. संपूर्ण चरित्र मांडणे, हे तर अशक्यप्रायच आहे; परंतु त्यांचा अल्प परिचय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आहे.
२७ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘याज्ञवल्क्य यांचा जन्म आणि ज्ञानलालसा, याज्ञवल्क्यांनी आदित्याची उपासना करणे आणि सूर्याने आशीर्वाद देणे’, यांविषयी माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/778122.html
४. याज्ञवल्क्य यांनी ‘श्री शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेय शाखा’ संस्था स्थापन करणे
गुरुआज्ञेने याज्ञवल्क्य स्वगृही परतले. मातेच्या चरणी नतमस्तक होऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करून स्त्री सहवासाने पूर्ण पुरुष होण्याचा मानस पित्यासमक्ष व्यक्त केला. शुक्ल यजुर्वेदाचा वाढदिवस श्रावण पौर्णिमेस असतो, त्या दिवशी भगवान सूर्यनारायणाने प्रसन्न होऊन याज्ञवल्क्य यांना शुक्ल यजुर्वेदाचा स्फूर्तीरूपाने पाठ दिला होता. त्या दिवशी याज्ञवल्क्य यांनी श्रावणी आटोपल्यावर सूर्यनारायण आणि सरस्वतीचे ध्यान करून ‘श्री शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेय शाखा’ या नावाची स्वतंत्र संस्था स्थापन केली. त्याच्या प्रचार, प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले. याच दिवसापासून ते याज्ञवल्क्य हे शाखा प्रवर्तक आणि मुख्य गुरुदेव झाले.
५. याज्ञवल्क्य यांचा विवाह होणे, त्यांची कीर्ती सर्वत्र पसरणे आणि त्यांनी सुधारित मंत्र सामर्थ्याने अनेक यज्ञ सफल करणे
कत गोत्रात उत्पन्न झालेल्या ‘कात्यायनी’ या सुशील सुंदर कन्येशी याज्ञवल्क्यांचा विवाह संपन्न झाला आणि एका सुसंस्कृत, सुसज्ज, संपन्न अन् धर्मपरायण गुरु आश्रमास प्रारंभ झाला. अनेक शिष्य आश्रमात अध्ययन करण्यास भरती झाले. अध्यापन आणि अध्ययन हे कार्य अव्याहतपणे आश्रमात चालत असतांना अचानक एके दिवशी याज्ञवल्क्य पुन्हा एकदा आश्रमाच्या बाहेर पडले, समवेत होते श्वेतकेतू आणि सोमशुष्म ! मजल दर मजल प्रवास करत, अनेक विद्वानांच्या भेटी घेत आणि ज्ञानचर्चा करत ही मंडळी जात असतांना अचानक राजा जनकाशी भेट झाली. महाराज जनक हे याज्ञवल्क्य यांची विद्वत्ता आणि ज्ञानाची ख्याती जाणून होते. त्यांच्यासमवेत मग अनेक चर्चा अग्निहोत्रासह इतर विषयांत घडल्या. याज्ञवल्क्यांची कीर्ती पताका अधिकच जोमाने सर्वत्र झळकून गेली. अनेक यज्ञांचे अध्वर्यूपद त्यांच्याकडे येऊ लागले. आपल्या आत्मज्ञानप्राप्तीने सिद्ध केलेल्या मंत्र सामर्थ्यामुळे सर्वच यज्ञ सफल होऊ लागले. त्यातून पुन्हा एकदा राजा जनकाच्या यज्ञात पूर्व गुरु वैशंपायन यांच्यासमवेत भेट झाली. ‘वैशंपायनाच्या अधिपत्याखाली चाललेल्या यज्ञाची सफलता होत नाही’, हे लक्षात येताच मागे बसलेल्या याज्ञवल्क्यांना बोलावले गेले. त्यांनी आपल्या सुधारित मंत्र सामर्थ्याने यज्ञ सफल केला. याज्ञवल्क्य यांचा सर्वत्र जयजयकार झाला; पण पुन्हा एकदा वैशंपायन यांचा मत्सर वाढला.
६. याज्ञवल्क्य यांचा ‘मैत्रेयी’ नावाच्या ज्ञानी विदुषीशी (विद्वान) विवाह होणे आणि ‘मैत्रेयी’ने ज्ञानलालसेने ज्ञान ग्रहण करणे
याच ठिकाणी ‘मैत्रेयी’ नावाची ज्ञानी विदुषी त्यांच्यावर भाळली आणि याज्ञवल्क्य यांचे आश्रमात दुरून त्यांचे पाठ ऐकणे, त्यांच्या अपरोक्ष सेवा करणे यांत धन्यता मानू लागली. पुढे याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांचा विवाह संपन्न झाला. या विवाहास कारणीभूत ठरली ती त्यांची प्रथम पत्नी कात्यायनी.
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितम्मुखम् ।
योसावादित्ये पुरुषः सोसावहम् । ॐ खं ब्रह्म ।
– यजुर्वेद, अध्याय ४०, कण्डिका १७
अर्थ : तेजोमय मंडलाद्वारे सत्यस्वरूप परमात्म्याचे मुख झाकलेले आहे. ते झाकणारे सूर्यमंडल मीच आहे. ते दृश्य परब्रह्म म्हणजे भगवान सूर्य.
हे ऐकणार्या मैत्रेयीच्या पित्याने वाघाच्या तावडीतून याज्ञवल्क्यांना सोडवले, असे त्यांच्या तोंडून ऐकतांना, अंगावरील रक्ताने माखलेला शेला पाहून एकीकडे भीती, तर दुसर्या अंतरंगी प्रेमाची उत्कट छटा अनुभवणार्या मैत्रेयीने याज्ञवल्क्य यांच्या आयुष्यात एक वेगळे आणि अढळ स्थान प्राप्त केले. अनेक विषयांवर मैत्रेयी त्यांच्यासोबत चर्चा आणि वादविवाद करत असे. यातूनच विश्वाच्या उत्पत्तीचे ज्ञान जाणण्याचा प्रयत्न करत असतांना ब्रह्म सूत्र, योग सूत्र, नारद भक्ती सूत्र यांसह आप, तेज, जल, वायु आणि आकाश या ईश्वरी तत्त्वांचे रहस्य जाणण्याचीही ज्ञानलालसा मनात ठेवून मैत्रेयी त्यांच्यासमोर बसत असे. या ज्ञान जिज्ञासा पूर्ण करतांना महर्षि याज्ञवल्क्य स्वतः व्यक्त होतांना म्हणत,
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
– ईशावास्योपनिषद्, शान्तिमन्त्र
अर्थ : ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, पूर्णानेच पूर्ण उदयाला येते, पूर्णातून पूर्ण काढून टाकल्यावर पूर्णच उरते.’
– अविनाश थिगळे
(साभार : ‘असोम सेवा प्रतिष्ठान’ आणि त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जानेवारी ते मार्च २०२४)