(संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, त्या दिवसाला ‘तुकाराम बीज’ असे म्हणतात)
देहू (पुणे) : वारकर्यांनी म्हटलेले भावपूर्ण अभंग आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम या जयघोषांमध्ये देहूनगरी दुमदुमून गेली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा, टाळ अन् मृदंग यांसोबत चिपळ्यांची साथ अशा भक्तीमय वातावरणामध्ये ‘तुकाराम बीज’ सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा झाला. संत तुकाराम महाराजांच्या ३७६ व्या बीज सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूमध्ये पोचले होते. पहाटे ३ वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. पहाटे ४ वाजता संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज, वारकरी यांच्या हस्ते श्री पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरामध्ये महापूजा करण्यात आली. सकाळी ६ वाजता वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली. सकाळी १० वाजता पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले.
त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यांमध्ये ह.भ.प. देहूकर महाराजांचे कीर्तन झाले. दुपारी १२ पर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचे ‘नामसंकीर्तन’ पार पडले. नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून भक्तीभावाने नमस्कार करत वारकर्यांनी इंद्रायणीकाठी भक्तीचैतन्य फुलवले. दुपारी १२.३० वाजता वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन झाले. कडक उन्हाळा असल्याने ठिकठिकाणी भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध केले असून इंद्रायणी नदीमध्ये वडिवळे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे टँकरही उभे करण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ४ बाह्यरुग्ण विभाग, ४ रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत.
‘पी.एम्.पी.एम्.एल्.’कडून १२५ अधिकच्या बसगाड्या !
‘पुणे महानगर परिवहन महामंडळ’ अर्थात् ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’कडून स्वारगेट, महापालिका भवन, आळंदी, पुणे स्थानक, निगडी, हडपसर या विभागांतून देहूसाठी अधिकच्या बसगाड्यांची व्यवस्था केली होती. प्रतिदिन देहूसाठी २५ बसगाड्या सोडल्या जातात; परंतु तुकाराम बीज सोहळ्याच्या निमित्ताने १२५ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.
देहूतील मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट !
मुख्य देऊळवाड्याला आकर्षक विद्युत् रोषणाई केली होती, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत तुकाराम महाराज शिळा मंदिर, राम मंदिर येथेही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती, तसेच नांदुरकी वृक्षाला विशेष फुलांची सजावट करण्यात आली होती.