Goa Spiritual Festival 2024 : सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्यामुळे गोव्याची पुरातन संस्कृती विश्वभर पोचत आहे ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

समुद्राची आरती करतांना  सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी,  मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह अन्य संतगण आणि मान्यवर

पणजी : गोव्यात योगसेतू, ज्ञानसेतू, कृषीसेतू आणि अटलसेतू, असे ४ सेतू निर्माण झाल्यानंतर संत-महंतांच्या पावन पदस्पर्शाने आज खर्‍या अर्थाने योगसेतूचे उद्घाटन झाले आहे. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्यामुळे गोव्याची पुरातन संस्कृती विश्वभर पोचत आहे. गोव्यात अनेक महोत्सवांचे आयोजन होत असते. यावर्षी सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या दिव्य प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेला हा ‘गोवा आध्यात्मिक महोत्सव’ प्रतिवर्षी आयोजित व्हावा आणि समस्त गोमंतकियांना एकत्रितपणे ‘समुद्र महाआरती’ करण्याची सुसंधी प्राप्त व्हावी, यासाठी शासनाद्वारे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

‘सत्गुरु फाऊंडेशन’ आणि श्री दत्त पद्मनाभ पीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला अन् आध्यात्मिक धर्मगुरु पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या दिव्य संकल्पनेने साकार झालेला ‘गोवा आध्यात्मिक महोत्सव’ १७ मार्च या दिवशी मांडवी नदीकिनारी, पणजी येथे परशुराम स्मारकाजवळ संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या आरंभी समुद्रकिनारी तपोभूमी वेदविदुषी महिला पुरोहितांद्वारे विश्वशांती यज्ञ झाला. त्यानंतर प्रार्थना आणि गोव्यातील १०० हून अधिक पखवाज वादक, हार्मोनियम वादक, गायक यांच्याद्वारे एकत्रितपणे सुंदर शास्त्रीय आणि वारकरी संगीताचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक पद्धतीने उपस्थित सर्व मुले, युवक आणि प्रौढ पुरुष, महिला या सर्वांनी श्रीमद्भगवद्गीतेतील १२ व्या अध्यायाचे पठण केले. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे गोव्याच्या इतिहासात प्रथमच ‘समुद्र महाआरती’चे आयोजन करण्यात आले आणि १ सहस्रहून अधिक युवक देव, देश अन् धर्म, तसेच संस्कृती रक्षणार्थ संकल्पबद्ध झाले. सर्व संत-महंत, महनीय आणि मान्यवर यांना ‘प्रमोटर ऑफ स्पिरिच्युॲलिटी’ (अध्यात्माला प्रोत्साहन देणारे) हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपिठावर अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरु अविचलदेवाचार्य स्वामीजी, ‘श्री रुक्मिणी पीठ, महाराष्ट्र’चे पिठाधीश्वर जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार; देहली येथील भगवान श्री लक्ष्मीनारायण धामचे प्रमुख महाब्रह्मर्षि महामंडलेश्वर कुमार स्वामीजी, ‘अखिल भारतीय सनातन सत्पंथ संप्रदाय, महाराष्ट्र’चे पिठाधीश्वर महामंडलेश्वर जनार्दन हरि स्वामीजी आणि कथाकार परमविदुषी गीता दीदीजी यांची वंदनीय उपस्थिती होती. त्याचप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सत्गुरु फाऊंडेशनच्या अध्यक्षा अधिवक्त्या ब्राह्मीदेवीजी आदींसह आंतरराष्ट्रीय स्तरावरून दक्षिण कोरिया, दुबई, लंडन येथून, तसेच राष्ट्रीय स्तरावरून मुंबई, गुजरात, राजस्थान येथून मान्यवर उपस्थित होते.

शासनाने गोव्यातील विकृतींचा नाश करून पुरातन संस्कृती पुनरुज्जीवित करावी ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

गोमाता, योग, भगवान परशुराम, समुद्र नारायण, ही गोव्याची खरी संस्कृती आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ऐतिहासिक मंदिरांची पुनर्उभारणी आणि गोव्याचा खरा इतिहास लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशाच प्रकारे शासनाने गोव्यातील विकृतींचा नाश करून पुरातन संस्कृती पुनरुज्जीवित करावी. त्यामुळे आध्यात्मिक गोवा हे स्वप्न साकार होणार, हे नक्की !

गोव्याचा सांस्कृतिक मेळा अनुभवला ! – जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार

गोवा राज्यात संस्कृती उद्योग आहे. आज आपण गोव्याचा सांस्कृतिक मेळा अनुभवला आणि समुद्रकिनारी आध्यात्मिक वातावणाची अनुभूती प्राप्त झाली. गोमंतकियांनी सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या खर्‍या संस्कृतीचा वारसा जपला आहे.