Yediyurappa POCSO : कर्नाटकचे माजी मुख्‍यमंत्री येडियुरप्‍पा यांच्‍याविरुद्ध पॉक्‍सो कायद्यातंर्गत गुन्‍हा नोंद

कर्नाटकचे माजी मुख्‍यमंत्री येडियुरप्‍पा

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे माजी मुख्‍यमंत्री आणि भाजपचे ८१ वर्षीय नेते बी.एस्. येडियुरप्‍पा यांच्‍याविरुद्ध येथील सदाशिवनगर पोलीस ठाण्‍यातील पोलिसांनी पॉक्‍सो कायद्यातंर्गत गुन्‍हा नोंदवला आहे. त्‍यांच्‍या विरोधात एका १७ वर्षांच्‍या मुलीच्‍या आईने लैंगिक अत्‍याचाराची तक्रार केल्‍यानंतर हा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, लैंगिक अत्‍याचाराची कथित घटना २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी घडली, जेव्‍हा आई आणि मुलगी फसवणुकीच्‍या एका प्रकरणात माजी मुख्‍यमंत्र्यांकडे साहाय्‍य मागण्‍यासाठी गेल्‍या होत्‍या.

तक्रार करणारी महिला मानसिक रुग्ण ! – गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर 

अन्वेषण होईपर्यंत काहीही सांगता येणार नाही. हे प्रकरण एका माजी मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे. हा एक अतिशय नाजूक विषय आहे. येडियुरप्पा हे ज्येष्ठ राजकारणी आहेत. यात राजकीय द्वेष नाही. एका महिलेने तक्रार केली. पोलीस कायद्यानुसार अन्वेषण करतील. आवश्यक असल्यास महिलेचे संरक्षण केले जाईल. तक्रार करणार्‍या महिलेने ती  मानसिकरित्या आजारी असल्याचे सांगितले आहे. तिने तक्रार हातात लिहिलेली नाही. टंकलेखन करून प्रत दिल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. अधिक माहिती मिळेपर्यंत काहीही सांगता येणार नाही, अशी माहिती कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर दिली.