Goa Schools Lottery Issue : शाळेसाठी निधी उभारण्यासाठी काढलेल्या सोडती (लॉटरीज) विद्यार्थ्यांना विकण्यास भाग पाडू नका !

गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा शिक्षण खात्याला आदेश

पणजी, १३ मार्च (वार्ता.) : शाळेसाठी निधी उभारण्यासाठी काढलेल्या सोडती (लॉटरीज) विद्यार्थ्यांना विकण्यास भाग पाडू नका, असा आदेश ‘गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’ने राज्यशासनाच्या शिक्षण खात्याला दिला आहे. विद्यार्थ्यांना सोडती विक्री करण्यास भाग पाडले जात असल्याच्या शिक्षण तज्ञ आणि पालक यांच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा आदेश दिला आहे.

गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस

‘गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष पीटर एफ्. बोर्जीस म्हणाले, ‘‘शाळेसाठी निधी उभारण्यासाठी संबंधित व्यवस्थापन सोडत (लॉटरी) काढतात. या सोडती शाळेतील विद्यार्थ्यांना विक्री करण्यासाठी दिल्या जातात आणि विद्यार्थ्यांना सोडत विक्रीसाठी ध्येयही दिले जाते. अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या बालमनावर विनाकारण ताण निर्माण होतो आणि त्यांचे यामुळे शोषणही होत असते. शाळेच्या व्यवस्थापनाने निधीचा गैरवापर केल्यास संबंधित विद्यार्थ्यालाही यामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना सोडत विकण्यास भाग पाडणे; म्हणजे विद्यार्थ्यांचा हक्क, मानसन्मान आदींवर बाधा आणल्यासारखे आहे. ही प्रथा तातडीने बंद होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिकण्यासाठी अनुकूल आणि सुरक्षित असे वातावरण निर्माण केले पाहिजे. शिक्षण खात्याने राज्यातील सर्व शाळांमधील अशी प्रथा चालू असल्यास ती तातडीने बंद करावी.’’ आयोगाने पुढील १५ दिवसांत शिक्षण खात्याकडून त्यांनी यावर कोणती कृती केली याविषयी अहवाल मागितला आहे.

संपादकीय भूमिका

असे शिक्षण खात्याला का सांगावे लागते ? असे कुठली शैक्षणिक संस्था करत असल्यास संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !