Ananth Kumar Hegde : राज्यघटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढण्यासाठी सुधारणा करावी लागणार !

भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांचे जाहीर सभेत विधान !

भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे

सिद्धपूर (कर्नाटक) – आपल्याला राज्यघटनेत पालट करावे लागणार आहेत. काँग्रेसच्या काळात राज्यघटनेत काही अनावश्यक पालट करण्यात आले, विशेषतः हिंदूंना अंकित ठेवण्यासाठी हे पालट केले गेले होते. आता हिंदूंच्या लाभासाठी राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द काढून टाकला जाऊ शकतो. जर हे सर्व पालट करायचे असतील, तर ते लोकसभेतील बहुमताने होणार नाही. आपल्याला लोकसभेत आणि राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमत हवे आहे, असे विधान भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी येथे एका सभेत केले. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खासदार हेगडे यांनी हे विधान केले.

(म्हणे) ‘डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या चौकटीत रहाण्यात भाजपला इतकी अडचण का?’ – काँग्रेस

१. खासदार हेगडे यांच्या या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसच्या एक्स खात्यावरून म्हटले आहे की, एकेकाळी भाजपचे खासदार राज्यघटनेत पालट करण्याची भाषा वापरत होते. आता ते राज्यघटनेत सुधारणा करण्याचे संकेत देत आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेच्या चौकटीत रहाण्यास भाजपच्या नेत्यांना अडचण वाटते का ?’, असा प्रश्‍न विचारला आहे.

२. राहुल गांधी यांनीही टीका करतांना पोस्ट केली आहे की, राज्यघटना पालटण्याचे भाजप खासदाराचे वक्तव्य म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या ‘संघ परिवारा’च्या छुप्या हेतूची जाहीर घोषणा आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी हक्क आणि लोकशाही यांचा तिरस्कार आहे. स्वातंत्र्य सेनानींच्या स्वप्नांसह हे कटकारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि राज्यघटनेने दिलेल्या लोकशाही हक्कांसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढत राहू.

३. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पोस्ट करतांना म्हटले की, मोदी आणि संघ यांना पुन्हा एकदा हुकूमशाही लादायची आहे. भाजपचे नेते त्यांची मनुवादी मानसिकता भारतातील जनतेवर लादतील आणि अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय यांचे अधिकार हिरावून घेतील. संघ परिवाराचे हे चुकीचे हेतू काँग्रेस यशस्वी होऊ देणार नाही.

संपादकीय भूमिका

काँग्रेसनेच आणीबाणीच्या काळात पाशवी बहुमताच्या आधारे राज्यघटनेत सुधारणा करून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द घातले आहेत, हे ती कशी विसरले ? आता जर जनतेला ते शब्द काढावेसे वाटत आहेत, तर त्यात चूक ती काय ?

अनंत कुमार हेगडे यांचे वैयक्तिक मत ! – भाजप

विरोधी पक्षांकडून टीका होऊ लागल्यानंतर भाजपने अनंत कुमार हेगडे यांच्या विधानावरून स्वतःला वेगळे केले आहे. ‘हेगडे यांचे ते वैयक्तिक मत आहे’, असे भाजपने म्हटले आहे. तसेच पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहित यांसाठी काम केले आहे.