ज्ञानवापीनंतर आता धारच्या भोजशाळेचे होणार सर्वेक्षण ! – उच्च न्यायालय, मध्यप्रदेश

  • मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाचा आदेश

  • ६ आठवड्यांत अहवाल सादर करण्याचाही आदेश

इंदूर (मध्यप्रदेश) – ज्ञानवापीच्या धर्तीवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने धार भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या मागणीवरील याचिकेवर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला ५ तज्ञांचे पथक बनवण्यास सांगितले आहे. या पथकाला ६ आठवड्यांत अहवाल सिद्ध करून सादर करावा लागणार आहे. हिंदु पक्षाने येथे होणार्‍या नमाजावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने सर्वेक्षणाची छायाचित्रे काढण्यासह चित्रीकरण करण्यास सांगितले आहे. हे वैज्ञानिक सर्वेक्षण ‘जी.पी.आर्.’ आणि ‘जी.पी.एस्.’ पद्धतीने करण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सौजन्य TIMES NOW

या प्रकरणी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत  पोस्ट करतांना म्हटले आहे की, मध्यप्रदेशातील धारच्या भोजशाळेच्या पुरातत्व  सर्वेक्षणाच्या माझ्या विनंतीला इंदूर उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. त्या आधारे सर्वेक्षणाची मागणी मान्य करण्यात आली.

मुसलमान भोजशाळेतील यज्ञकुंड अपवित्र करतात !

‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेने १ मे २०२२ या दिवशी इंदूर खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट केली आहे. ‘भोजशाळेचे संपूर्ण नियंत्रण हिंदूंच्या हाती द्यावे’, असे यात सांगण्यात आले आहे. प्रत्येक मंगळवारी हिंदू भोजशाळेत यज्ञ करून शुद्धीकरण करतात आणि शुक्रवारी मुसलमान नमाजाद्वारे यज्ञकुंड अपवित्र करतात. हे थांबवले पाहिजे. तसेच  भोजशाळेचे छायाचित्रण आणि चित्रीकरण यांसह उत्खनन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

काय आहे वाद ?

धारची भोजशाळा राजा भोजने बांधली होती. जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळानुसार, हे एक विद्यापीठ होते, ज्यामध्ये वाग्देवीची (सरस्वतीदेवीची) मूर्ती बसवण्यात आली होती. मुसलमान आक्रमकांनी येथे आक्रमण करून तिचे रूपांतर मशिदीत केले. याचे अवशेष येथील मौलाना कमालउद्दीन मशिदीतही पहायला मिळतात. ही मशीद भोजशाळेच्या परिसरातच आहे, तर वाग्देेवीची मूर्ती लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.

हिंदूंना पूजा आणि मुसलमानांना नमाजपठण यांसाठी आहे अनुमती !

प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना दुपारी १ ते ३ या वेळेत नमाजपठण करण्यासाठी भोजशाळेत प्रवेश दिला जातो, तर प्रत्येक मंगळवारी हिंदूंना पूजा करण्याची अनुमती आहे. दोन्ही पक्षांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. याखेरीज वसंतपंचमीला सरस्वती पूजेसाठी, हिंदूंना दिवसभर पूजा आणि हवन करण्याची अनुमती आहे. वर्ष २००६, २०१२ आणि २०१६ मध्ये शुक्रवारी वसंतपंचमी आली, तेव्हा वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. वसंतपंचमीला शुक्रवार असतांना हिंदूंना पूजा करण्याची अनुमती आहे आणि मुसलमानांनाही नमाजपठण करण्याची अनुमती आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी वसंतपंचमी आली की, पूजा आणि नमाज या दोन्ही गोष्टी चर्चेत असतात. वर्ष २०२६ मध्ये अशी परिस्थिती उद्भवू शकते.

काय आहे ‘जी.पी.आर्.’ आणि ‘जी.पी.एस्.’ ?

‘जी.पी.आर्.’ म्हणजे ‘ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार’. भूमीच्या खाली असणारी रचना तपासण्याचे हे तंत्र आहे. यामध्ये रडारचा वापर करण्यात येतो. याद्वारे भूमीखाली असलेल्या वस्तू आणि संरचना अचूकपणे मोजता येते. त्याचप्रमाणे ‘जी.पी.एस्.’ म्हणजे ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम’. याद्वारेही भूमीचे सर्वेक्षण केले जाते.

संपादकीय भूमिका 

मध्यप्रदेशातील धारची भोजशाळासुद्धा हिंदूंची आहे, हे या सर्वेक्षणातून वैज्ञानिक दृष्टीने सिद्ध होणार आहे. अशाच प्रकारे आता देशातील ज्या मंदिरांना पाडून त्यांच्या मशिदी बनवण्यात आल्या, तेथेही असे होणे आवश्यक आहे. त्यासाठी न्यायालयात न जाता केंद्र सरकारनेच पुरातत्व विभागाला आदेश दिला पाहिजे, असे कुणाला वाटले, तर चुकीचे ठरू नये !