जिल्हा परिषद शिक्षकांची अद्यापही ९८६ पदे रिक्त


रत्नागिरी – जिल्ह्यात रिक्त असलेल्या २ सहस्र प्राथमिक शिक्षकांच्या पदांपैकी १ सहस्र ६८ शिक्षकांची भरती ‘पवित्र पोर्टल प्रणाली’द्वारे करण्यात आली आहे. यामध्ये १ सहस्र १४ शिक्षकांची भरती झाल्याने हे शिक्षक जिल्ह्याला मिळालेले आहेत; मात्र ही भरती प्रक्रिया केल्यानंतरही जिल्हा परिषद शाळांमध्ये ९८६ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्या पदांचा प्रश्न कसा सोडवला जाणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून पुन्हा काही शाळांमध्ये शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील शिक्षक भरती गेली अनेक वर्षे रखडली होती. आंतरजिल्हा स्थानांतरामुळे शिक्षकांची संख्याही प्रतीवर्षी वाढत होती. शिक्षक अल्प असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत होती. ‘शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत’, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सातत्याने होऊ लागली. जिल्ह्यात ५ सहस्र ७५० शिक्षकांपैकी २ सहस्रांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त होती. त्यानंतर शासनाने एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्के पदे भरण्यास अनुमती दिली होती. त्यानुसार राबवण्यात आलेल्या शिक्षक भरतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला १ सहस्र ६८ नवे शिक्षक मिळाले. त्यातील ५४ शिक्षक पडताळणीच्या वेळी अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे १ सहस्र १४ पदांवर उमेदवार निश्चिती झाली आहे.