५५० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कराची वसुली !

मालमत्ता कर वसुलीसाठी नवी मुंबई महापालिकेची धडक कारवाई !

नळजोडण्या खंडित केलेल्या ३१ थकबाकीदारांनी कर भरला

श्री. विजय भोर, प्रतिनिधी

नवी मुंबई, ७ मार्च – नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक कारवाईची मोहीम चालू करण्यात आली आहे. यामध्ये २१६ थकबाकीदारांच्या मालमत्तांना अटकावणी (शासनजमा) करण्यात आली असून ५५० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने ही कारवाई चालू आहे.

१. नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी ८०१ कोटी रुपये उत्पन्न जमा करण्याचे उद्दिष्ट मालमत्ता कर विभागाला देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक ६ मासांनी शहरातील मालमत्ता करधारकांना देयके दिली जातात. थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या जातात.

२. मार्चपर्यंत मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये विभागाकडून करवसुलीसाठी प्रभावी कार्यवाही केली जाते.

३. ३१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून १४९ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. या कारवाईमुळे त्यांनी त्वरित थकबाकीचे धनादेश दिले. या कारवाईमध्ये ३२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली.

हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्याकरिता काही दिवस राहिल्याने ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. या अंतर्गत थकबाकीदारांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता कह्यात घेण्यात येणार आहेत. यामध्ये घर, कार्यालय, त्यातील साहित्य, गाड्या, एखाद्या आस्थापनातील कच्चा आणि पक्का माल, यंत्रसामग्री जप्त करण्यात येणार आहे. थकबाकीदारांच्या बँकेची खातीही गोठवण्यात येणार आहेत.

संपादकीय भूमिका :

वारंवार कर भरला न जाणे म्हणजे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !