Teele Wali Masjid Case : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘टीलेवाली मस्जिद’च्या प्रकरणी हिंदूंची बाजू ऐकली जाणार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : येथील गोमती नदीच्या डाव्या बाजूला ‘टीलेवाली मस्जिद’ आहे. हिंदूंनी ‘येथे पूर्वी ‘लक्ष्मण टीला’ होती’, असे सांगत न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. या संदर्भात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मुसलमानांची फेरविचार याचिका फेटाळत हिंदूंची बाजू मान्य केली आहे. आता या प्रकरणावर कनिष्ठ न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण वर्ष २०१३ पासून न्यायालयात प्रलंबित आहे.

१. हिंदूची बाजू मांडणारे अधिवक्ता नपेंद्र पांडे म्हणाले की, मुसलमान पक्ष ज्याला ‘टीलेवाली मस्जिद’ म्हणतो, ती ‘लक्ष्मणाची टेकडी’ आहे. लक्ष्मणपुरी (लखनौ) हे शहर श्रीरामाचे बंधू लक्ष्मण याने वसवले होते. गोमती नदीच्या काठावर एक टेकडी होती. याला ‘लक्ष्मण का टीला’ असे म्हटले जाते. औरंगजेबाच्या काळात ही टेकडी उद्ध्वस्त करून  तेथे मशीद बांधण्यात आली. आमची पूजा त्या ठिकाणी आधीपासूनच होत होती. वर्ष २००१ मध्ये येथे दंगल घडवण्यात आली आणि आमचे टीलेश्‍वर महादेव मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. शेषनागेश पाताल विहीर पाडण्यात आली. आम्हाला पूजा करण्यापासून का रोखले जात आहे ? जेव्हा आम्ही तिथे पूजा करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा मुसलमानांनी असभ्य वर्तन केले. यविषयी मुसलमानांनी न्यायालयात म्हटले की, हे प्रकरण कायम ठेवण्यायोग्य नाही; कारण त्यातील कारण स्पष्ट नाही. त्यावर न्यायालयाने मुसलमानांनी बाजू फेटाळून हिंदूंची बाजू सुनावणीस पात्र असल्याचा निर्णय दिला.

टीलेवाली मस्जिद

२. टीलेवाली मशिदीचे मौलाना फजलुल मन्नान म्हणाले की, ही मशीद जगप्रसिद्ध आहे. ‘हिंदूंच्या सर्व धार्मिक स्थळांच्या वर मशिदी बांधल्या आहेत’, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे लोकांना भांडायला लावणारे आहे. मी या गोष्टी नाकारतो. जर लक्ष्मण का टीला पाडून मशीद बांधली जात होती, तर तुम्ही कुठे होता?, असा प्रश्‍न त्यांनी हिंदूंना विचारला.

(सौजन्य : Zee Uttar Pradesh UttaraKhand)

३. हे प्रकरण वर्ष २०१३ पासून न्यायालयात सुरू आहे. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी लक्ष्मणपुरी न्यायालयात याविषयी पहिली याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. या संपूर्ण परिसर शिवमंदिराचा असून येथील मशीद हटवून हा परिसर हिंदूंच्या कह्यात देण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर वर्ष २०१८ मध्ये मशिदीच्या आवारात लक्ष्मणाची मूर्ती बसवण्यावरून वाद निर्माण झाला होता. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर भाजपचे नगरसेवक रजनीश गुप्ता आणि रामकृष्ण यादव यांनी लखनौ महापालिकेला मशिदीजवळ लक्ष्मणाचा १५१ फूट उंच पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला होता; मात्र मुसलमानांच्या विरोधानंतर प्रकरण शांत झाले.

संपादकीय भूमिका

हिंदूंची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करून तेथे मशिदी बांधण्यात आला, हा इतिहास आहे. प्रत्येक स्थळाविषयी अशी मागणी हिंदूंना करावी लागू नये, यासाठी आता केंद्र सरकारनेच पावले उचलणे आवश्यक !