धर्मनाथ बीज उत्सव संकटमुक्त आनंद देणारा सोहळा ! – प्रवचनकार मिलिंद चवंडके

निर्व्यसनी रहाण्याची आणि मांसाहार न करण्याची गावकर्‍यांनी घेतली शपथ

प्रवचनकार मिलिंद चवंडके

नगर – धर्मनाथ बीज उत्सव संकटमुक्त आनंद देणारा सोहळा आहे. आपल्या प्रपंचामधील संकटे भस्मसात् व्हावीत; म्हणून नाथ संप्रदायाच्या पद्धतीने घरा-घरात धर्मनाथ बीज उत्सव श्रद्धेने साजरा करावा, असे आवाहन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांनी केले. पारनेर तालुक्यामधील जवळे येथे धर्मनाथ बीज उत्सवात येथील पुरातन धर्मनाथ मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या पहिल्या प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते. श्री. रणजित इंगळे यांनी स्वागत करतांना धर्मनाथ बीज उत्सवात प्रथमच प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. श्री. चवंडके यांनी उपस्थित सर्वांकडून निर्व्यसनी रहाण्याची आणि मांसाहार न करण्याची शपथ घेतली. भाविक गावकर्‍यांनी धर्मनाथ मंदिरातील मूर्तीचे आपल्या ह्रदयसिंहासनावर स्मरण करत श्रद्धायुक्त अंतःकरणाने शपथ घेतली.

श्री. चवंडके पुढे म्हणाले, ‘‘श्रीक्षेत्र काशी येथील लोकप्रिय त्रिविक्रम राजाच्या देहात परकाया प्रवेश करत मच्छिंद्रनाथांनी १२ वर्षे राज्यकारभार पाहिला. या कालावधीत महाराणी रेवतीस पुत्ररत्न प्राप्त झाले. तेच धर्मनाथ होत. मच्छिंद्रनाथांचे सुशिष्य गोरक्षनाथ यांनी धर्मनाथांना माघ शुक्ल व्दितीयेला दीक्षा दिली. ती स्मृती म्हणून धर्मनाथ बीज उत्सव साजरा केला जातो. येथील धर्मनाथांच्या मंदिरासमोरच काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे, हे विशेष होय. धर्मनाथांच्या जन्मकथेचे कायम स्मरण करून देणारी एकमेकांसमोरील ही दोन्हीही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे नाथपंथाचे गुह्यच सांगतांना दिसतात. आपल्या जवळे गावाला पेशवेकालीन इतिहासाचे संदर्भ आहेत. येथील गावकरी भाग्यवान आहेत. या मंदिरांचे पावित्र्य पिढ्यान् पिढ्या श्रद्धेने जपत आले आहेत. नाथांना अपेक्षित असलेले कार्य येथे अखंड घडावे आणि धर्मनाथ बीज उत्सवही नाथ संप्रदायाच्या पद्धतीनेच साजरा व्हावा.’’

प्रवचन सोहळ्यास सर्वश्री प्रकाश बडवे, कृष्णाजी बडवे, सचिन पठारे, झावरे गुरुजी, चंद्रकांत लोखंडे, नवनाथ सालके, रवींद्र पठारे, नामदेव बरशिले, ज्ञानेश्वर जाधव, राजेंद्र निमसे, सोन्याबापू मुदळ, दत्तात्रय बरशिले, विठ्ठल रासकर यांच्यासह ज्येष्ठ ग्रामस्थ आणि नारायणपूर येथील सेवेकरी मंडळ उपस्थित होते. तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.