सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !  

शिबिरात रुग्णावर प्रथमोपचार कसा करावा याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन  

ग्णाची अवयव पडताळणी कशी करावी ? याचे प्रात्यक्षिक दाखवतांना कु. सुषमा महामुनी (उभ्या असलेल्या) आणि सौ. स्वाती घोडके (साडी नेसलेल्या)

सोलापूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी १८ फेब्रुवारी या दिवशी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे आणि सौ. स्नेहा भोवर यांनी सांगितला. ‘रुग्णाची अवयव पडताळणी कशी करावी ?’ याविषयी कु. सुषमा महामुनी यांनी मार्गदर्शन केले, तर ‘अपघातग्रस्त रुग्णावर प्रथमोपचार कसा करावा ?’, ‘नाडी कशी पडताळावी ?’, ‘बेशुद्ध व्यक्तीवर छातीदाबन कसे करावे ?’, ‘प्रथमोपचार पेटीमध्ये कोणत्या वस्तू असाव्यात ?’ यांसारख्या विविध विषयांवर कु. रश्मी चाळके, सौ. स्वाती घोडके, सौ. जयश्री कांबळे, सौ. नेने या समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे प्रथमोपचाराचे प्रकार दाखवले. ‘शिबिराच्या माध्यमातून रुग्णाला प्रथमोपचार देण्यासंदर्भात विविध बारकावे लक्षात आले’, असे अनुभव कथन शिबिरार्थींनी केले. या वेळी ४० शिबिरार्थींनी यामध्ये सहभाग घेतला.

रुग्णाची अवयव पडताळणी कशी करावी ? याचे प्रात्यक्षिक दाखवतांना समितीचे कार्यकर्ते
बेशुद्ध व्यक्तीवर छातीदाबन कसे करावे ? याचे प्रात्यक्षिक दाखवतांना कु. रश्मी चाळके

विशेष – प्रथमोपचारातील बारकावे शिक्षण्यासाठी उपस्थितांना प्रथमोपचार प्रशिक्षण नियमित मिळण्यासाठी प्रथमोपचार वर्गाची मागणी केली.

अनुभव कथन

१. अमरजा थिटे – मी ब्लड बँकेत सोशल वर्कर आहे. आम्ही आमचे काम करतांना आणखी काय सुधारणा करायला हवी, हे मला पहायचे होते. या शिबिराच्या माध्यमातून मला अनेक बारकावे शिकता आले. यापुढे माझ्या कामामध्ये मी या प्रशिक्षणाचा निश्चित वापर करेन.

२. अर्चना सगर – मी आशा सेविका आहे. आम्हाला लहान मुलांच्या संदर्भात प्रथमोपचार शिकवला जातो; पण या शिबिरामध्ये रुग्णावर प्रथमोपचार कसा करावा ? याविषयी अनेक बारकावे शिकता आले.