US Moon Landing : ५१ वर्षांनंतर प्रथमच अमेरिकी यानाने चंद्रावर पाय रोवले !

‘इंट्युइटिव्ह मशीन्स’ या आस्थापनाची मोहीम यशस्वी !

वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताच्या ‘चंद्रयान-३’ची मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता अमेरिका हा भारतानंतर दुसराच देश ठरला आहे, ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान यशस्वीरित्या उतरवले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार २३ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजून ५३ मिनिटांनी अमेरिकेच्या ‘इंट्युइटिव्ह मशीन्स’ या आस्थापनाचे ‘ओडिसेस’ नावाचे लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरले. या यानाला ‘आयएम्-१’ या नावानेही ओळखले जाते. पुढील १४ दिवस ते कार्यरत असेल. चंद्रावरील विविध माहिती यानावरील संवेदकांद्वारे (‘सेन्सर्स’द्वारे) गोळा केली जाणार आहे. अमेरिकेतील भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी या आस्थापनाचे साहाय्य घेतले जाणार आहे.

सौजन्य : बिझीनेस टूडे 

‘ओडिसेस’ची वैशिष्ट्ये !

१. वजन : १ सहस्र ९०० किलो

२. प्रक्षेपणाचा कालावधी : ८ दिवस – १५ फेब्रुवारीला प्रक्षेपण; २१ फेब्रुवारीला चंद्राच्या कक्षेत पोचले आणि २३ फेब्रुवारीच्या पहाटे चंद्रावर पाय रोवले.

३. ‘ओडिसेस’ ६ पायांचे आहे.

४. आकार : ४.३ मीटर उंचीचे षटकोनी यान. एका छोट्या ‘एस्.यू.व्ही.’ (खेळ आणि नियमित वापरासाठी बनवण्यात आलेली चारचाकी वाहन) एवढे हे यान आहे.

अमेरिकेच्या चंद्रमोहिमा !

अमेरिकेने चंद्रावर अनेक मोहिमा केल्या असून १९ डिसेंबर १९७२ या दिवशी ‘अपोलो-१७’ मोहिमेच्या माध्यमातून अमेरिकेचे शेवटचे दोन अंतराळवीर चंद्रावर उतरले होते. अपोलो मोहिमेच्या अंतर्गत अमेरिकेचे एकूण १२ अंतराळवीर चंद्रावर उतरले आहेत.  यानंतर थेट चंद्राभोवती विविध याने जरी अमेरिकेने पाठवली असली, तरी प्रत्यक्ष चंद्रावर उतरणारी कोणतीही मोहीम आखली नव्हती.

‘नासा’ची आगामी महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम !

‘आर्टिमिस प्रोग्रॅम’च्या माध्यमातून चंद्रावर मुक्काम करण्याची मोहीम अमेरिकेच्या नासाने हाती घेतली आहे. वर्ष २०२५ नंतर अमेरिकी अंतराळवीर चंद्रावर पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि काही दिवस चंद्रावर मुक्कामही करणार आहेत.