मुंबईतील १९ उपनगरीय स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत पुनर्विकास होणार !

मुंबई – मुंबईतील १९ उपनगरीय स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करतील. देहलीतील कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे हा शुभारंभ केला जाईल. यामध्ये मध्य रेल्वेच्या ११, तर पश्चिम रेल्वेच्या ८ स्थानकांचा समावेश आहे. ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत देशभरातील एकूण १ सहस्र ३०९ रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. या स्थानकांचे आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनसमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या स्थानकांवर अत्याधुनिक, आरामदायी आणि उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ फेब्रुवारी या दिवशी देशभरातील १ सहस्र ५०० उड्डाणपुलाचे, तसेच अंडरपासचे लोकार्पण आणि अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील ५५४ स्थानकांच्या विकासकामांची पायाभरणी करणार आहेत.

मध्य रेल्वेवरील स्थानके : भायखळा, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा

पश्चिम रेल्वेवरील स्थानके : मरीन लाइन्स, चर्नीरोड, ग्रँट रोड, लोअर परेल, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड, पालघर