बीड पोलिसांचा जिल्हा न्यायालयात प्रस्ताव प्रविष्ट !
बीड – मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या वेळी जिल्ह्यामध्ये अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून ७९ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता बीडमध्ये प्रविष्ट एकूण ७९ गुन्ह्यांपैकी ३६ गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. या संदर्भात बीड पोलिसांच्या वतीने न्यायालयात प्रस्ताव प्रविष्ट करण्यात आला आहे.
मराठा आंदोलनाच्या वेळी सर्वाधिक हिंसाचार बीड जिल्ह्यामध्ये झाला होता. यामध्ये बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची घरे, कार्यालये आणि उपाहारगृह यांना आग लावली होती. अनेक ठिकाणी ‘रस्ता बंद’ आंदोलनही झाले होते. रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले होते. ३० ऑक्टोबर २०२३ या दिवशी बीड येथे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्यांवर आक्रमण केले होते. या सर्व घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.