नेहरू भारताचे पंतप्रधान कि शत्रू ?

‘सरदार पटेल यांच्यासारखा हिंदुत्वनिष्ठ नेता पंतप्रधानपदी बसावा’, हेच अमान्य !

पंडित नेहरू आणि सरदार पटेल

१. केवळ गांधींना ‘सरदार पटेल नको’ असल्याने त्यांचे बहुमत डावलून त्यांनी नेहरूंना पंतप्रधान बनवणे !

आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली आहेत; पण हिंदूंच्या दुर्दैवाने आणि भोंगळ स्वभावामुळे या देशावर ७६ वर्षांपैकी जवळपास ५४ वर्षे हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांनीच राज्य केले. वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदासाठी काँग्रेस पक्षाने पक्षातंर्गत निवडणूक घेतली होती. त्या वेळी १५ पैकी १२ राज्ये काँग्रेस समित्यांनी भारताच्या पंतप्रधानपदासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना मतदान केले होते. ३ राज्य काँग्रेस समित्यांनी मतदान केले नव्हते. पंडित नेहरू यांना एकही मत मिळाले नव्हते; परंतु म. गांधी यांना ‘सरदार पटेल यांच्यासारखा कट्टर हिंदुत्वनिष्ठ नेता भारताच्या पंतप्रधानपदी बसावा’, हे मुळीच मान्य नव्हते. गांधी हे नेहमीच मुसलमानांच्या बाजूने राहिले होते. ‘हिंदु समाजासमवेत मुसलमान समाजाचेही आपण अनभिषिक्त नेता व्हावे’, या विचाराने ते झपाटले होते. त्यामुळे मुसलमानांनी हिंदूंवर कितीही अमानुष अत्याचार केले, तरी ते त्याकडे दुर्लक्ष करून हिंदूंनाच अहिंसेचे तत्त्वज्ञान शिकवत असत ! सरदार पटेल यांचा स्वभाव मुसलमानांच्या उद्दामपणाला ‘जशाच तसे’ उत्तर देण्याचा होता. असा हिंदूंची बाजू घेणारा नेता म. गांधींना नको होता; म्हणून त्यांनी सरदार पटेलांना मिळालेले बहुमत डावलून पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधानपदी बसवले.

म. गांधी

२. नेहरूंना पंतप्रधान केल्याने हिंदूंचा छळ होऊन देश खंडित होत रहाणे

गांधींच्या या घोडचुकीमुळे भारताची, हिंदु समाजाची तर अतोनात हानी झालीच; पण गांधींना मुसलमान समाजानेही त्यांचा नेता कधीच मानले नाही. ‘काफीर कितीही विद्वान आणि श्रेष्ठ दर्जाचा असला, तरी मुसलमानांना त्या काफिरापेक्षा आपल्या धर्मातील फाटका धर्मबंधूच अधिक जवळचा वाटत असतो’, हे वास्तव  गांधी यांच्या लक्षात कधीच आले नाही. गांधींच्या मुसलमान अतिरेकी अनुनयाच्या कथा अगणित आहेत. त्या कथा सांगण्याचे हे स्थळ नाही; पण एकमात्र निश्चितपणे सांगता येईल की, म. गांधींनी सार्वमत डावलून भारताच्या पंतप्रधानपदी सरदार पटेल यांच्याऐवजी पंडित नेहरू यांना बसवल्यानंतर या देशात हिंदूंचा छळ चालू झाला. भारत खंडित होत गेला.

श्री. शंकर गो. पांडे

३. अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेले नेहरू !

पंडित नेहरूंविषयी असे म्हटले जात होते, ‘नेहरू शिक्षणाने इंग्रज आणि संस्कृतीने मुसलमान होते. केवळ अपघाताने त्यांचा जन्म हिंदु म्हणून झाला होता. (He is English by education, Muslim by culture and born merely as Hindu by accident.)’ आपल्याविषयीची वरील धारणा पंडित नेहरू यांनी त्यांच्या १७ वर्षांच्या राजवटीत त्यांच्या आचरणाने वारंवार सिद्ध केली ! पंडित नेहरू यांना हिंदु धर्म, संस्कृती, सभ्यता यांविषयी फारशी श्रद्धा नव्हती. त्यांच्या कार्यकाळात हिंदूंना कायम दुय्यम स्थान मिळाले.

४. भारताची संस्कृती आणि सभ्यता नष्ट करण्याचा विडा उचललेले नेहरू !

      पंडित नेहरू यांच्याविषयी सामाजिक माध्यमांमध्ये २ व्हिडिओ पहाण्यात आले. त्यांचा थोडक्यात आशय पुढीलप्रमाणे होता. पंडित नेहरू यांच्या कार्यकाळात फ्रान्सचे एक शिष्टमंडळ भारत भेटीवर आले होते. त्यांनी त्यांची भेट घेऊन भारतात फिरण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर हे शिष्टमंडळ भारताच्या अनेक प्रसिद्ध शहरात, तीर्थस्थळी आणि खेड्यापाड्यांत फिरून देहलीत परत आले. ते परत आल्यानंतर त्यांनी पंडित नेहरू यांची पुन्हा भेट घेतली. त्यांनी पंडित नेहरूंना उत्साहाने सांगितले, ‘‘भारताची संस्कृती, सभ्यता, लोकजीवन, त्यातील प्रथा, परंपरा पुष्कळ श्रेष्ठ प्रतीच्या आहेत. येथील सभ्यता पुष्कळ प्राचीन असून समृद्ध आहे. हिंदु धर्मातील सणवार, विविध उत्सव आणि रिती, हिंदूंच्या श्रद्धा, सहिष्णुता सारे काही विलोभनीय आहे. येथील खेड्यातील जनता अशिक्षित असली, तरी सुसंस्कृत आहे. त्यांची या धर्मातील देवीदेवता, साधू-संत, गाय, गंगा यावर अतूट निष्ठा आहे. भारतातील एकत्र कुटुंबपद्धत तर सर्व जगाने अनुसरावी अशी आहे.’’ हे स्तुतीगान ऐकून पंडित नेहरूंनी काय उत्तर द्यावे ? ते म्हणाले, ‘‘मला भारताची हीच सभ्यता आणि संस्कृती नष्ट करायची आहे !’’

५. भारताला सैन्यमुक्त करण्याची स्वप्ने पहाणारे नेहरू देशाचे पंतप्रधान कि शत्रू ?

पंडित नेहरूंचा देशाच्या सुरक्षेविषयीचा आणि अखंडतेविषयीचा भोंगळपणा या देशाला पुष्कळ महागात पडला आहे. भारताच्या सीमा सुरक्षित असाव्यात, भारताची सैन्यशक्ती पुरेशा प्रमाणात असावी, तिच्याजवळ लढण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रसामुग्री असावी यांकडे पंडित नेहरूंनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. उलट ‘भारताला सैनिकांची आवश्यकता नाही !’, असे त्यांचे मत होते. या संबंधातीलही एक व्हिडिओ माझ्या पहाण्यात आला. त्यात असे दाखवले आहे की, पंडित नेहरू यांनी एकदा ब्रिटीश जनरलला प्रश्न विचारला होता, ‘‘भारताला सैन्यापासून मुक्ती मिळेल, असा एखादा उपाय तुमच्याकडे आहे का ?’’ या प्रश्नामुळे त्या जनरलला पुष्कळ आश्चर्य वाटले. ते पंडित नेहरूंना म्हणाले, ‘‘खरेच तुम्ही हा प्रश्न गंभीरपणे विचारत आहात का ?’’ त्यावर पंडित नेहरू ‘हो’ म्हणाले. त्यावर जनरल म्हणाले, ‘‘असे केले आणि कुणी देशाने तुमच्यावर आक्रमण केले, तर त्याचा प्रतिकार कोण करील ?’’ तेव्हा नेहरू म्हणाले, ‘‘असे झाले, तर आमचे पोलीस लढतील !’’

आज पंडित नेहरू यांचे पणतु राहुल गांधीही आपल्या पणजोबांचीच भाषा बोलत आहेत. त्यांचाही भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास नाही. भारताने पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल’ आणि ‘एअर स्ट्राईक’वरही (काळजीपूर्वक केलेली सैन्य कारवाई) त्यांच्या पक्षाने अविश्वास व्यक्त केला होता. एकदा ते म्हणाले होते ‘‘नरेंद्र मोदींना जमत नसेल, तर या देशातील शेतकरी, गरीब कामगार चीनशी लढा देतील आणि चिनी सैन्याला शेकडो किलोमीटर मागे ढकलून देतील !’’

६. एक तृतीयांश काश्मीर मुसलमानांना घेऊ देणारे नेहरू भारतद्वेष्टेच !

      नेहरू यांनी केलेल्या चुकांचे दुष्परिणाम आजही देश भोगत आहे. वर्ष १९४७ मध्ये पाक सैनिकांनी काश्मीरवर आक्रमण केले. काश्मीरचा पुष्कळसा भाग आपल्या कह्यात घेतला; पण भारतीय सैनिक जेव्हा काश्मीरमध्ये उतरले, तेव्हा पाक सैन्याचा पराभव होऊ लागला. या युद्धाच्या वेळी भारतीय सैनिक पूर्ण काश्मीर आपल्या कह्यात घेत असतांना अचानक नेहरू यांनी युद्धबंदीचा आदेश दिला आणि एक तृतीयांश काश्मीर पाकिस्तानच्या घशात घातला. हीच काश्मीरची समस्या आज कायमची डोकेदुखी ठरली आहे. यामुळे आजपर्यंत अगणित भारतीय सैनिकांची जीवित आणि अन्य वित्त यांची अपरंपार हानी केली आहे.

७. चीनला साहाय्य करून तिबेट गिळंकृत करून देणारे नेहरू !

खरे तर तिबेट हे भारत आणि चीनमधील एक ‘बफर स्टेट’. (चीन आणि भारतीय सीमांमध्ये आवश्यक अशी जागा निर्माण करणारे राज्य) तिबेटमुळे चीनच्या सीमा भारतापासून पुष्कळ दूर आणि सुरक्षित होत्या. तिबेट सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्याही भारताच्या जवळचा होता. तेव्हा तिबटचे रक्षण करणे आणि त्याला मजबूत करणे, हे भारताचे आद्यकर्तव्य होते; पण भारताने हे कर्तव्य पार पाडले नाही. वर्ष १९५२ मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले. भारताने याचा कडवा विरोध करायला हवा होता; पण पंडित नेहरू यांनी या सैनिकी आक्रमणाला विरोध करणे तर दूरचे, उलट चीनला साहाय्य केले. चीनचे सैनिक आणि त्यांना लागणारे शस्त्रास्त्र, दारूगोळा, अन्नधान्य इतक्या दूरवर अाणणे चीनला कठीण होते; पण विस्तारवादी चीनने हे धाडस केलेच. याउलट भारताला ल्हासा भागाचे रक्षण करणे सोपे होते; कारण लडाख ते ल्हासा हे अंतर केवळ २४० किलोमीटर होते. चीनमधून तिबेटमध्ये जाण्यासाठी रस्तेही नव्हते; पण भारतातून जाण्यासाठी असे रस्ते होते; पण पंडित नेहरूंनी शांत राहून चीनला तिबेट गिळंकृत करू दिला. एवढेच नाही, तर चीनला या कामी साहाय्यही केले. चीनने तिबेटवर आक्रमण तर केले; पण काही दिवसांतच त्यांच्या सैनिकांचे खाण्या-पिण्याचे भयंकर हाल होऊ लागले; पण चीनविषयी ममत्व असणार्‍या पंडित नेहरूंनी चीनच्या सैनिकांसाठी साडेतीन सहस्र टन तांदूळ भारतातून पाठवला.

देहलीमध्ये २१ जून १९५२ या दिवशी एक पत्रकार परिषद झाली होती. त्यात पत्रकारांनी खोदून खोदून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना नेहरू यांनी शेवटी दबक्या आवाजात मान्य केले की, त्यांनी साडेतीन सहस्र टन तांदूळ चीनच्या सैनिकांसाठी पाठवला आहे. यामागचे कारण सांगतांना नेहरू म्हणाले, ‘‘चीनच्या सैन्यांसाठी तांदूळ पाठवणे पुष्कळ आवश्यक होते. नाही तर चिनी सैनिक भुकेपायी मेले असते. त्यांनी जिवंत रहावे, यासाठी आम्ही साहाय्य करत आहोत.’’ ‘सिलेक्टेड वर्ल्ड ऑफ जवाहरलाल नेहरू, सिरीज क्रमांक २, व्हॉल्यूम १८’ या पुस्तकात वरील वृत्तांत प्रकाशित झाला आहे.

८. भारताला मिळालेला ‘व्हेटो’ (प्रतिबंध करण्याचा अधिकार) नेहरूंनी चीनला देणे !

पंडित नेहरूंना चीनविषयी एवढे ममत्व का वाटत होते ? काही समजत नाही ! वर्ष १९५१ मध्ये अमेरिकेने भारतासमोर सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व आणि त्या निमित्ताने मिळणारा ‘व्हेटो’चा अधिकार (केवळ संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना असलेला प्रतिबंध करण्याचा अधिकार) स्वीकृत करावा, याविषयीचा प्रस्ताव ठेवला होता; पण उदार अंतःकरणाच्या पंडित नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारून सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वाचे आणि व्हेटोच्या अधिकाराचे दान चीनच्या पदरात टाकले अन् जागतिक राजकारणात चीनला शक्तीशाली बनवले आणि भारताला मागे टाकले.

९. नेहरूंची चीनप्रेमाची परंपरा त्यांच्या वंशजांकडूनही पुढे चालवली जाणे !

विशेष म्हणजे नेहरू यांची चीनविषयीची प्रेमाची परंपरा त्यांच्या घराण्यातील वारसांकडून अद्यापही निष्ठेने पुढे चालवली जात आहे ! वर्ष २००८ मध्ये कोणताही शासकीय अधिकृत अधिकार नसतांना काँग्रेसचे महसचिव राहुल गांधी यांनी चीनच्या साम्यवादी पक्षाशी एक करार (Mou अर्थात् ममोरंडम ऑफ अंडरस्टॅडिंग) केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. हा करार राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत केला होता. या कराराप्रमाणे चीनच्या साम्यवादी पक्षाला भारताविषयीची हवी ती माहिती पुरवण्यात येणार होती. खरे तर दोन पक्षांमध्ये जे काही करार होत असतात, ते दोन देशांच्या अधिकृत सरकारांमध्ये होत असतात. कोणत्याही देशातील कोणत्याही राजकीय पक्षाला अन्य देशांशी करार करण्याचे अधिकार नसतात; पण राहुल गांधी यांनी असा करार केला आणि तोही चीनसारख्या शत्रू राष्ट्राशी. याला काय म्हणावे ? चीनसाठी उतू जाणारे नेहरू घराण्याचे प्रेम देशासाठी अत्यंत घातक ठरले आहे. या कराराच्या मोबदल्यात चीनकडून ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला भरघोस साहाय्य मिळाल्याचेही एक प्रकरण उघडकीस आले आहे.          (क्रमशः पुढील रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.