संपादकीय : ‘भारत जोडो’वाल्यांचे पाकप्रेम !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर

बहुधा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांना समोर ठेवूनच ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, ही म्हण निर्माण झाली कि काय ?, अशी शंका येण्याजोगी विधाने ते नित्य करत असतात. पाकिस्तान येथे नुकत्याच झालेल्या ‘फैज महोत्सवा’त ‘विचार’ मांडण्यासाठी नेहमीप्रमाणे अय्यर महाशयांना आमंत्रित करण्यात आले होते. शत्रूराष्ट्राला अय्यर यांचे ‘विचार’ ऐकावेसे वाटतात, यातच सर्व आले ! तेथे त्यांनी अपेक्षेप्रमाणे भारतावर टीका करत पाकिस्तानचे गुणगान केले. त्यापाठोपाठ गोवा येथे आयोजित १२ व्या कला आणि साहित्य महोत्सवात ‘धर्मनिरपेक्ष मूलतत्त्ववाद्यांच्या आठवणी’ या विषयावर बोलतांनाही अय्यर यांनी त्यांचे ‘विचार’ मांडले. ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानप्रश्नी तोडगा काढण्यासाठी भारताला त्याच्याशी चर्चा करावी लागेल. पाकिस्तान सरकारशी आपले मतभेद असू शकतात; पण त्यात त्या देशातील लोकांचा काय संबंध ? पाकिस्तानचा सामना करण्यासाठी ‘सर्जिकल’ किंवा ‘एअर स्ट्राईक’सारखे धाडस दाखवण्याची आवश्यकता नसून एका मंचावर येऊन पाकिस्तानी लोकांशी संवाद साधणे आवश्यक आहे. मागील १० वर्षांत (मोदी सरकारच्या कारकिर्दीत) असा संवाद साधण्याचे धाडस आपण दाखवलेले नाही.’’ एवढ्यावरच थांबतील, तर ते अय्यर कसले ? पुढे ते ‘पाकिस्तानी लोक (मुसलमान) ही तेथील भारतियांची सर्वांत मोठी संपत्ती आहे’, असेही बरळले. अय्यर यांची ही विधाने कुठल्याही राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या मनात चीड निर्माण करणारी आहेत. अय्यर यांच्याच पक्षाचे नेते तथा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी ‘या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे विधान केले होते. यावरून ‘काँग्रेसचे खोडच सडलेले आहे’, हे लक्षात येते. त्यामुळे काँग्रेसरूपी  विषवृक्षाचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे.

भारतविरोधी भूमिका !

कुठल्याही देशाची त्याच्या शत्रूराष्ट्राविषयी एक विशिष्ट भूमिका असते. सत्तेत कुणाचेही सरकार आले, तरी ही भूमिका शक्यतो पालटली जात नाही. पाकिस्तानच्या संदर्भात भारतानेही भूमिका निश्चित केलेली आहे, ती म्हणजे ‘जोपर्यंत पाकिस्तान आतंकवादाला खतपाणी घालायचे थांबवत नाही, तोपर्यंत त्याच्याशी चर्चा करणार नाही.’ काँग्रेसच्या यापूर्वीच्या सरकारांनीही ही भूमिका पाळली आहे. तरीही काँग्रेसचे नेते अय्यर हे भारताला या भूमिकेपासून परावृत्त करत आहेत. त्यांची ही भूमिका भारताच्या भूमिकेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करायला हवी.

एकीकडे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा चालू आहे, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते पाकप्रेमाचे गुणगान करून एक प्रकारे ‘भारत तोडो’ मोहीम राबवत आहेत. अय्यर हे प्रत्येक वर्षी पाकिस्तानमध्ये जाऊन तेथे भारतविरोधी गरळओक करतात आणि प्रत्येक वेळी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा आदी काँग्रेसचे नेते त्यांना साधी समजही देत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. याचा अर्थ ‘अय्यर यांचे ‘विचार’ ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे’, हे सिद्ध होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर तेजोनिधी होते. ते भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा मुकुटमणी होते. आज काँग्रेसवाले ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहेत; परंतु सावरकरांनी त्या वेळी ‘सीमा सशस्त्र करण्यास सांगून एक प्रकारे ‘भारत जोडो’चा कृती आराखडाच समोर ठेवला होता. काँग्रेसला अंदमानातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्यपंक्तींमधील तेज सहन झाले नाही आणि हेच अय्यर महाशय केंद्रीय मंत्री असतांना त्यांनी त्या पंक्ती काढल्या होत्या. त्यामुळे अय्यर यांना कुणीतरी सांगितले पाहिजे की, ‘भिंतीवरच्या पंक्ती काढणे’, हे धाडस नसून सावरकरांसारखी प्रखर राष्ट्रभक्ती जोपासून आयुष्यभर त्यागी जीवन जगणे, हे खरे धाडस आहे ! काँग्रेसवासियांना हे जमण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जसे सावरकर हिंदूंचे मुकुटमणी शोभतात, तसे ‘मणी’शंकर हे पाकचे मुकुटमणी शोभतात !

अय्यरांसमोर आरसा धरा !

अय्यर यांना पाकिस्तानी नागरिक हे भारतियांची संपत्ती वाटतात. जे लोक जिहादी आतंकवाद्यांविरुद्ध कधी ‘ब्र’ही काढत नाहीत, जे हिंदु महिलांवर बलात्कार करतात, हिंदूंची मंदिरे पाडतात, हिंदूंची संपत्ती लुटतात, ते लोक काँग्रेसवाल्यांना संपत्ती वाटतात ! याउलट ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचे आवाहन करणारे, खर्‍या अर्थाने सहिष्णु असणारे हिंदू मात्र शत्रू वाटतात ! अय्यर यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, काँग्रेस पक्षाच्या धुरिणांनी जर फाळणीला अनुमती दिली नसती, तर अय्यर यांच्यावर अशी केविलवाणी विधाने करण्याची वेळ ओढवली नसती. त्यामुळे अय्यर यांना दोष द्यायचाच असेल, तर त्यांनी तो काँग्रेसच्या फाळणीविरांना दिला पाहिजे, ते खरे धाडस !

काँग्रेसला पाकवासी करा !

काँग्रेसला पाकिस्तानी नागरिक ही संपत्ती वाटतात. त्यामुळे त्यांच्या या ‘अमूल्य संपत्ती’चा सांभाळ करण्यासाठी काँग्रेसलाच पाकिस्तानमध्ये पाठवले पाहिजे. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानमध्येसुद्धा इतक्या सातत्याने कुणी भारतविरोधी वक्तव्ये करत नसावेत. त्यामुळे सतत भारतविरोधी वक्तव्ये केल्यावरून पाकिस्तान सरकारनेही अय्यर यांच्यासारख्यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पाकिस्तानचा सर्वाेच्च नागरी पुरस्कार बहाल करायला हवा. याखेरीज सध्या पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेची चढाओढ लागली असल्याने तेथे स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेसने तेथे जाऊन पाकला पाठिंबा द्यायला हवा ! एरव्ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेही विदेशात जाऊन भारत सरकारवर टीका करतच असतात. काँग्रेसचे नेते अय्यर यांच्यापासून शशी थरूर यांच्यापर्यंत सर्वांनाच पाकप्रेमाचे उमाळे फुटत असतात. खरे तर त्यांचे हे पाकप्रेम काँग्रेसलाच अडचणीत आणत आहे. तरीही काँग्रेस गप्प आहे. यावरून काँग्रेसने ‘स्वतःला संपवायचे; पण सुधारायचे नाही’, ही भूमिका स्वीकारल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या नेत्यांकडून अशी आणखी वक्तव्ये होत राहिल्यास ‘भारत जोडो’ दूरचेच; पण भारत मात्र काँग्रेसमुक्त होईल हे निश्चित ! येत्या एप्रिल मासाच्या आसपास भारतात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीत राष्ट्रप्रेमी नागरिक ‘काँग्रेसमुक्त भारत’ करतील.

शत्रूराष्ट्राचे गुणगान करणार्‍यांना ‘देशद्रोही’ ठरवून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचा कायदा सरकारने करणे आवश्यक !