Germany Protest : जर्मन नागरिक नसलेल्यांना जर्मनीबाहेर काढण्यासाठी नाझी विचारांच्या समर्थकांचा प्रयत्न !

  • एका राजकीय पक्षाचे समर्थन

  • जनतेचा विरोध

बॉन (जर्मनी) – दुसर्‍या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी जर्मनीचा हुकूमशाहा हिटलर याच्या नाझी सैन्याचा पराभव केला. जर्मनीतून नाझीवाद मुळासकट नष्ट केला; मात्र अद्यापही तेथे या विचारांच्या लोकांचे अस्तित्व कायम आहे. जर्मनीमध्ये दुसरा मोठा पक्ष असलेल्या ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ने (ए.एफ्.डी.ने) देशातील नाझी समर्थकांसमवेत मिळून जर्मन नागरिक नसलेल्या लोकांना जर्मनीतून बाहेर हाकलण्याचा कट रचला आहे. ‘करेक्टिव्ह’ या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ए.एफ्.डी. आणि नव नाझी समर्थकांची एक बैठक झाली. या बैठकीचा जर्मनीचे नागरिक नसलेल्यांना देशातहून हाकलण्याच्या सूत्रावर चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार जर्मनीमध्ये आश्रय घेतलेले आणि अनुमती घेऊन रहाणारे या सर्वांना त्यांच्या देशांत परत पाठवण्याचा विचार करण्यात आला. या बैठकीत उच्च पदाधिकारी, व्यावसायिक आदींचा सहभाग होता.

लोकांचा विरोध !

ए.एफ्.डी. पक्षाच्या बैठकीत जर्मन नसलेल्या लोकांना देशाबाहेर हाकलण्यावर चर्चा झाल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जर्मनीत अनेक शहरांतील लोक या विरोधात रस्त्यावर उतरले.  लोकांच्या म्हणण्यानुसार ही बैठक लोकशाही आणि घटनात्मक मूल्ये यांच्या विरोधात आहे. लोकांनी ‘ए.एफ्.डी. पक्ष जर्मनीच्या लोकशाहीला धोका आहे’, असे म्हटले आहे. जर्मनीच्या राज्यघटनेत नमूद केले की, एखाद्या व्यक्तीचे मूळ, वंश, भाषा किंवा त्याचा मूळ देश या सूत्रांवरून तेथे भेदभाव केला जाऊ शकत नाही.

ए.एफ्.डी. पक्षावर बंदी घालण्याची मागणी

या घटनेनंतर ए.एफ्.डी. पक्षावर बंदी घालण्यावर चर्चा चालू झाली आहे. गृहमंत्री थॉमस स्ट्रॉबल म्हणाले की, सुरक्षा अधिकार्‍यांना पक्षावर बंदी घालण्यासाठी पुरेसे पुरावे सापडले, तर त्याचा विचार केला पाहिजे. जर्मनीमध्ये केवळ फेडरल घटनात्मक न्यायालय राजकीय पक्षावर बंदी घालू शकते.

१. ‘स्थलांतरित किंवा विदेशी मूळ वंशाच्या नागरिकांना बाहेर काढण्याची योजना जर्मनीच्या लोकशाहीवर आक्रमण आहे.’ – ओलाफ शुल्ज, चान्सलर, जर्मनी  

२. ‘लाखो लोकांना देशातून काढण्याची योजना जर्मनीच्या इतिहासात सर्वांत काळ्या अध्यायाची (हिटलरने केलेल्या ज्यू लोकांच्या वंशसंहाराची) आठवण करते.’ – ख्रिश्‍चियन ड्यूर, खासदार, डेमोक्रॅटिक पार्टी