|
मुंबई, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – युनेस्कोने (संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेने) जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली घारापुरी लेणी हे भगवान शिवाचे प्राचीन स्थान आहे. हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थान असलेल्या घारापुरी लेण्यांत हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा, या मागणीसाठी हिंदूंनी १५ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन केले. सुदर्शन वाहिनीच्या पुढाकाराने आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी घारापुरी येथील शिवपिंडीची पूजा-अर्चा करण्यात आली. सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या पूजाविधीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर हेही उपस्थित होते.
मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे सकाळी १०.३० वाजता एकत्र येऊन सर्व धर्मप्रेमी बोटीने घारापुरी येथे गेले. हातात भगवे ध्वज घेऊन ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा देत हिंदूंनी घारापुरी येथील शिवमंदिरात प्रवेश केला. येथील शिवपिंडीला गंगेच्या जलाने अभिषेक करून पुष्प अर्पण करून सामूहिक आरती केली. या ठिकाणी शिवस्तोत्राचे पठण करून हिंदूंनी ‘हर हर महादेव’चा जयघोष केला. या वेळी उपस्थित सर्व हिंदूंमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
#Mumbai के पास घारापुरी गुफाओं में शिवपिंडी की पूजा की अनुमति दें !
हिन्दू संगठनों ने आंदोलन के पश्चात प्रतीकात्मक पूजा कर केंद्र सरकार से की मांग !
👉पुरातत्व विभाग के सभी धार्मिक स्थलों पर हिन्दुओं को पूजा का अधिकार मिलना चाहिए! – @SureshChavhanke
👉धार्मिक स्थान पर पूजा… pic.twitter.com/R8VpWU3icR
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) February 16, 2024
काय आहे प्रकरण ?
घारापुरी बेट हे भौगोलिकदृष्ट्या रायगड जिह्यातील उरण तालुक्यात आहे. घारापुरी येथील लेणी ६ व्या ते ८ व्या शतकांतील असल्याचे मानले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य शिलेमध्ये गुफा निर्मिण करून त्यामध्ये भगवान शिवाच्या विविध कथांमधील प्रसंगांची शिल्पे येथील दगडांवर साकारण्यात आली आहेत. ही सर्व शिल्पेही भव्य आहेत. ही शिल्पे म्हणजे भारतीय शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. येथे ५ गुंफांचे समूह असून या सर्व गुंफांमध्ये शैवलेणी कोरण्यात आली आहेत. पोर्तुगिजांच्या काळात या शिल्पांची तोडफोड केली गेली. ब्रिटिशांच्या काळात या शिल्पांवर गोळीबारीचा सराव करण्यात आला. त्यामुळे सद्यःस्थितीत येथील बहुतांश शिल्पे भग्न झाली आहेत. ही लेणी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून येथील शिवपिंडीची पूजा-अर्चा बंद आहे.
धार्मिकस्थळी पूजेचा अधिकार नसणे, हा हिंदूंवरील अन्याय ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
केंद्रीय संसदीय समितीच्या अहवालानुसार पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पूजा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. याचा अर्थ केंद्रशासनाचीही तीच इच्छा आहे. केंद्रशासनाच्या अखत्यारीतील केंद्रीय पुरातत्व विभागाने जर त्यांच्या अखत्यारीतील धार्मिक ठिकाणी पूजेची अनुमती दिली असेल, तर राज्यांनाही ती देण्यास काहीच हरकत नाही. जगन्नाथपुरी येथे कोणार्कच्या श्री सूर्यमंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार नाही. सूर्यदेवाची मूर्ती समोर असूनही हिंदूंना देवाची पूजा करता न येणे, हा एक प्रकारे अन्यायच आहे.
हिंदूंनी आपल्या संस्कृतीचा आदर केला, तर अन्यही करतील ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
जीवन जगतांना संस्कृतीचा अभिमान बाळगायला हवा. घारापुरी येथील लेणी आमची संस्कृती आहे. कुणासाही ही श्रद्धास्थाने असतील, तर कुणासाठी ही पूजास्थाने असतील. दृष्टीकोन वेगवेगळे असू शकतात; मात्र ही लेणी आमच्या पूर्वजांनी घडवली आहेत, हे सत्य आहे. त्यामुळे त्यांचा अवमान करणे कुणालाही आवडणार नाही. कुणी आपल्या घरात यायचे आणि देवघरात चपला घालून शिरायचे, हे योग्य नाही. चर्चमध्ये जोडे घालून जाणे चालत असले, तरी हिंदूंच्या देवघरात चपला घालणे, ही आपली संस्कृती नाही. आपण आपल्या संस्कृतीचा आदर केला, तर अन्यही करतील. घारापुरीवासियांना माझी विनंती आहे की, त्यांनी येथे येणार्या पर्यटकांना याविषयी सांगायला हवे. हिंदूंचा स्वाभिमान आता जागृत होत आहे. अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे निर्माण झालेला विश्वास आता सर्वत्रच्या हिंदूंमध्ये निर्माण होत आहे.
पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील सर्व धार्मिक स्थळी हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनी
पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मंदिरांमध्ये पूजा होत नाही; पण पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मशिदींमध्ये नमाजपठण होते. एवढेच काय; पण पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या हिंदूंच्या धार्मिक स्थळांमध्ये चप्पलही घालून जाऊ दिले जाते. घारापुरी येथील धार्मिक स्थळाचीही अशीच स्थिती आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत हिंदूंची जेवढी धार्मिक ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी पूजा-अर्चा चालू करण्यासाठी अनुमती मिळावी, तसेच तेथे पादत्राणे घालून प्रवेश करण्यावर बंदी घालावी, अशा आमच्या मागण्यात आहेत. घारापुरी हे भगवान शंकराचे स्थान आहे. हिंदूंचे हे पूजास्थान आहे. भगवान शिवाच्या मंदिरात सोमवारी पूजा केली जाते. हे ठिकाण मात्र सोमवारी बंद केले जाते, हे जाणीवपूर्वक केले जात आहे का ? यापुढे सोमवारी येथे प्रवेश देण्यात यावा.
ज्योत्स्ना गर्ग यांच्या प्रश्नावरून उभे राहिले जनआंदोलन !
‘नेशन फस्ट’ या राष्ट्रप्रेमी संघटनेच्या सरचिटणीस सौ. ज्योत्स्ना गर्ग यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या मुलाखतीच्या वेळी पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या घारापुरी येथील भगवान शिवाच्या मंदिरात पादत्राणे घालून पर्यटक जात असल्याविषयी प्रश्न उपस्थित केला. त्यावर सुरेश चव्हाणके यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व हिंदूंना घारापुरी येथील शिवमंदिरात पूजनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या आवाहनावरून हिंदूंनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन घारापुरी येथे शिवपिंडीचे पूजन केले !
पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील मंदिरांत पूजेसाठी पुजार्यांची नियुक्ती करावी ! – सौ. ज्योत्स्ना गर्ग, सरचिटणीस, नेशन फस्ट
पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व मंदिरांमध्ये गर्भगृहापर्यंत पादत्राणे घालून जाण्यात येते. हिंदूंची प्राचीन मंदिरे ही आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत असून हा हिंदूंचा स्वाभिमान आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत जेवढी मंदिरे आहेत, तेथे पादत्राणे घालण्यावर बंदी घालावी, तसेच तेथे पुजार्यांची नियुक्ती करावी.
पूजेसाठी पुरातत्व विभागाकडे मागणी केली आहे ! – बळीराम ठाकूर, उपसरपंच, घारापुरी
घारापुरी येथील मंदिर हे शिवमंदिर आहे. त्यामुळे ‘घारापुरी गुंफा सोमवारी बंद असू नये’, अशी मागणी आम्ही यापूर्वीच भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे. ‘येथील शिवमंदिरात पूजा करता यावी’, अशी मागणीही पुरातत्व विभागाकडे केली.