Elon Musk On Putin : पुतिन यांनी युक्रेन युद्धातून माघार घेतल्यास त्यांची हत्या होण्याची शक्यता !

अमेरिकी अब्जाधीश इलॉन मस्क यांचा दावा

अमेरिकी अब्जाधीश इलॉन मस्क व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

न्यूयॉर्क (अमेरिका) – १० दिवसांतच रशिया-युक्रेन युद्धाला तब्बल २ वर्षे पूर्ण होतील. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची नुकतीच एक मुलाखत प्रसारित झाली आहे. यामध्ये ते स्पष्टपणे सांगत आहेत की, रशिया युक्रेनमधील युद्धातून आता मागे हटणार नाही. यासंदर्भातच अमेरिकी अब्जाधीश इलॉन मस्क यांनीही त्यांच्या मालकीच्या ‘एक्स’वर घेतलेल्या ‘एक्स स्पेसेस’ कार्यक्रमात याला दुजोरा दिला. त्यांनी दावा केला की, जर पुतिन युद्धातून मागे हटलेच, तर ते मारले जाण्याची शक्यता आहे. तसेच पुतिन युक्रेनशी चालू असलेल्या युद्धात पराजित होतील, अशी कोणतीही शक्यता नाही.

सौजन्य : WSJ News

मस्क यांनी आयोजित केलेल्या या ऑनलाईन चर्चासत्रात विविध अमेरिकी खासदार आणि राजकीय नेते उपस्थित होते. चर्चेचा विषय हा रशियाच्या विरोधात युक्रेनला अमेरिकेने सैनिकी साहाय्य करावे कि करू नये, असा होता. चर्चेत भाग घेतलेल्या खासदारांमध्ये विस्कॉन्सिनचे रॉन जॉन्सन, ओहायोचे जे.डी. व्हॅन्स, उटाहचे माईक ली, विवेक रामास्वामी आणि ‘क्राफ्ट व्हेंचर्स’ आस्थापनाचे सहसंस्थापक डेव्हिड सॅक्स यांचा समावेश होता.

युक्रेनच्या विजय हे केवळ एक स्वप्न ! – खासदार रॉन जॉन्सन

या वेळी रॉन जॉन्सन म्हणाले की, जे लोक रशियाविरुद्ध युक्रेनच्या विजयाची अपेक्षा करत आहेत, ते प्रत्यक्षात स्वप्नांच्या जगात वावरत आहेत. युक्रेनला साहाय्य करण्यासाठी अमेरिकी संसदेत आणलेल्या विधेयकावर अमेरिकी नागरिक त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधतील. या खर्चातून युक्रेनला कोणतेही साहाय्य मिळणार नाही. युद्ध वाढवण्याने युक्रेनला लाभ होणार नाही.