‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची फोंडा (गोवा) पोलिसांकडे मागणी

पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांना निवेदन देतांना डावीकडून सर्वश्री विवेक केणी, भारत पुरोहित आणि सत्यविजय नाईक

फोंडा, १३ फेब्रुवारी : ‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतराला प्रोत्साहन देणारी पत्रके वितरित करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री मयूर कन्नावर, विवेक केणी, भारत पुरोहित, अजय पुरोहित, सुरेंद्र अग्रहरी, जयंत जगताप आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. तुषार लोटलीकर यांच्याकडे केली आहे. हिंदुत्वनिष्ठांनी याविषयीचे निवेदन पोलीस निरीक्षकांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, ११ फेब्रुवारी या दिवशी फोंडा बसस्थानकावर ‘माझ्या पापांना कोण माफ करणार ?’, या शीर्षकाखालील पत्रकांचे काही ख्रिस्ती संघटनांचे सदस्य वाटप करत होते. लोकांना कोणती भाषा येते याविषयी विचारणा करून त्या भाषेतील पत्रके वितरित केली जात होती. या पत्रकांवर ‘फोंडा प्रेयर हाऊस’, सी.एस्.आय. सभागृह, फर्मागुडी असा पत्ता दिलेला असून या पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकात ‘मूर्तीपूजक (हिंदू) आगीमध्ये जळतील’, ‘येशूला समजून घेऊन त्याचा अंगीकार करा आणि जीवनाचा उद्धार करा’, आदी आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. धार्मिक तेढ निर्माण करणे, हा गुन्हा असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘बिलिव्हर्स’च्या विरोधातील कारवाईनंतर गोव्यात नवनवीन नावांनी पास्टर डॉम्निकसारख्या व्यक्ती आणि ‘बिलिव्हर्स’सारख्या संघटना उदयास येऊ लागल्या आहेत. अशा नवनवीन संघटनांवरही सरकारने त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.