‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात नागपूरच्या उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांना निवेदन !

उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

नागपूर, १३ फेब्रुवारी (वार्ता.) –  प्रेमाचे बीभत्स सादरीकरण ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर बघायला मिळते. या दिवशी होणार्‍या मेजवान्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन, महिलांवरील अत्याचार आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झालेली दिसते. या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात. काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘लव्ह जिहाद’चा बळी बनवतात. यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती वाढत आहे. यामुळे हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसे होऊ नये; म्हणून या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी आध्यात्मिक आणि समाजसेवी संघटनांच्या वतीने या ‘डे संस्कृती’ला विरोध करण्यासाठी या विषयाचे निवेदन नागपूरचे माननीय उपजिल्हाधिकारी सचिन गोसावी, तसेच सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना देण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी सचिन गोसावी यांनी ‘‘आम्ही सगळीकडे सुव्यवस्था ठेवू’’, असे आश्वासन या वेळी दिले. ‘‘जिथे अप्रिय घटना घडू शकतात तिथे बंदोबस्त करणे, रात्री गस्त घालणे असे करू’’, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले.

या वेळी चित्पावन ब्राह्मण महासंघाचे जिल्हा सचिव श्री. उमाकांत रानडे, बजरंग दलाचे श्री. तुषार देवगडे, हिंदुत्वनिष्ठ श्री. पुंडलिक ननावरे, मंदिर विश्वस्त श्री. प्रदीप पांडे, श्री. महादेवराव दमाहे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला उपस्थित होते.