‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थे’च्या कार्याची सखोल चौकशी व्हावी ! – डॉ. नीलेश लोणकर

केडगाव पोलीस ठाणे परिसरात ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’ विरोधात निषेध सभा !

निषेध सभेच्या ठिकाणी फलकाद्वारे निषेध करणारे हिंदुत्वनिष्ठ

केडगाव (ता. दौंड, जिल्हा पुणे) – धर्मांतर प्रकरणी पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे आणि संस्थेच्या कार्याविषयी सखोल चौकशी करून धर्मांतर विषयक प्रश्नांची सखोल चौकशी व्हायला हवी. तसेच संस्थेला १०० वर्षांपूर्वी ९९ वर्षांच्या करारावर मिळालेल्या भूमीचा मालकी हक्क संबंधित भूमीपुत्रांच्या वारसदारांना मिळावा, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचाचे डॉ. नीलेश लोणकर यांनी केली. येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थे’मध्ये भरती केलेल्या निराधार मुलींचे सक्तीने धर्मांतर केले जाते. याच कारणावरून एका पीडित मुलीच्या मावशीने शिवाजीनगर, पुणे येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. ११ फेब्रुवारीला या संघटनेच्या माध्यमातून बोरीपारधी आणि केडगाव बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात येणार होता; मात्र पोलिसांनी मोर्चाला अनुमती दिली नाही. राजकीय आणि प्रशासकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे नियोजित असणारा निषेध मोर्चा होऊ शकला नाही. त्यामुळे केडगाव पोलीस चौकीसमोर या घटनेचा निषेध करत हिंदु समाजाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी अभिषेक परदेशी, राजू गायकवाड, तुषार चव्हाण, गणेश ताकवणे, अनिकेत गायकवाड, प्रवीण लोखंडे, शेखर देशमुख, कविराज खोमणे, सचिन बनसोडे आदी उपस्थित होते.

आमदार नीतेश राणे यांची यासंदर्भात आवाज उठवण्याची चेतावणी !  

भाजपचे आमदार राम सातपुते यांनी हे सूत्र विधानसभेत उपस्थित केले होते; मात्र पोलिसांच्या चौकशीत ‘मिशन’ला ‘क्लीन चीट’ (निर्दाेष) देण्यात आली आहे. त्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी यासंदर्भात आवाज उठवण्याची चेतावणी दिली आहे.

या वेळी खालील मागण्या करण्यात आल्या.

१. मुलींवर झालेल्या अन्यायाची चौकशी व्हावी.

२. पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी.

३. चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थेवर प्रशासक नेमावा

४. संस्थेला दिलेल्या भूमीचा करार संपला असल्याने ती मूळ मालकांना द्यावी किंवा शासनाकडे जमा करावी.

५. परदेशात पाठवलेल्या मुलींचे पुढे काय होते ? याची चौकशी व्हावी


निषेध सभेतील उपस्थितांनी व्यक्त केलेली मते !

आपण घटनात्मक चौकटीमध्ये पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करणे, हा आपला घटनात्मक अधिकार आहे; मात्र संबंधित पीडितांवर झालेल्या अत्याचाराविषयी आपण उघडपणे निषेधही व्यक्त करू शकत नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. – श्री. संदीप टेंगले

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी पीडितेने माझ्याकडे साहाय्य मागितले. – अधिवक्ता ओंकार तापकीर