Pakistan Election : नवाझ शरीफ आणि आसिफ अली झरदारी यांच्या पक्षांची आघाडी होण्याची चिन्हे !

पाकिस्तान निवडणूक !

नवाझ शरीफ आणि आसिफ अली झरदारी

इस्लामाबाद/लाहोर – पाकमध्ये सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना वेग आला असून ‘पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ’ पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी ११ फेब्रुवारीच्या रात्री ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे नेते आसिफ अली झरदारी आणि बिलावल भुट्टो झरदारी यांची भेट घेतली. पाकमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता आघाडी करण्याचा प्रयत्न होत आहे.

इम्रान खान यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा अपक्षांचा प्रयत्न !

अशातच सर्वाधिक जागा मिळालेल्या इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाच्या पाठिंब्याने विजयी झालेल्या अपक्षांनी त्यांची साथ सोडून  नवाझ शरीफ यांच्या पक्षाला पाठिंबा देण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे खान यांच्या पक्षाने अपक्षांना त्यांच्याशी जोडून ठेवण्याची रणनीती आखली आहे. पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांना भरण्यासाठी प्रतिज्ञापत्रे दिली जात आहेत. खान यांच्या संमतीखेरीज ते कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, असे त्यात लिहिले आहे.

इम्रान खान यांच्याखेरीज पीटीआय सरकार स्थापन करण्यास तयार नाही. पक्षाचे अध्यक्ष गौहर अली खान यांनी म्हटले की, आमच्याकडे बहुमत आहे. त्याचा सन्मान केला नाही, तर आम्ही विरोधी पक्षात बसणे पसंत करू.