पुणे – ‘ससून’ रुग्णालयातून अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील पळून गेला होता. या प्रकरणांमध्ये अनेकांवर दोषारोपपत्र प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे, असे असतांना शरद मोहोळ यांच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देणारा मार्शल लुईस लीलाकर हा पोलिसांना गुंगारा देत ‘ससून’मधून पळून गेला. पुणे शहर पोलिसांनी २ दिवसांपूर्वी त्याला अटक केली होती. आता तो पळून गेल्याने पुन्हा एकदा ‘ससून रुग्णालय’ आणि ‘पुणे पोलीस’ चर्चेत येत आहेत. (एका आरोपीवर लक्ष ठेवू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? – संपादक)
पहाटे लीलाकर याने छातीत दुखत असल्याचे सांगितल्याने त्याला येरवडा कारागृहातून ‘ससून’मध्ये उपचारांसाठी भरती केले होते. तेथून त्याने पळ काढला. (यावरून छातीत दुखणे, हे पळून जाण्यासाठी निमित्त केले नाही ना ? – संपादक) लीलाकर याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ८ पथके पाठवली आहेत. लीलाकर याने सामाजिक माध्यमांवरून ‘रील्स’ (चलचित्रफीत) आणि संदेश करून स्वाती मोहोळ यांना धमकी दिली होती.