१. मित्रांसमवेत ट्रेकिंगला (गिर्यारोहणाला) गेल्यावर गुरुतत्त्व प्रक्षेपित होत असल्याची जाणीव होणे
‘२२.५.२०२२ या दिवशी मी मित्रांच्या समवेत ट्रेकिंगला गेलो होतो. सकाळी जाग आल्यापासूनच माझ्या लक्षात होते की, आज गुरुदेवांचा वाढदिवस आहे. मला ‘वातावरणातून गुरुतत्त्व प्रक्षेपित होत आहे’, याची अधून-मधून जाणीव होत होती.
२. तुकाई डोंगरावर ध्यान लावून बसणे
तुकाई डोंगरावरचे तुकाई मंदिर हा आमचा परतीचा टप्पा होता. आम्ही चारी बाजूंनी डोंगर आणि मध्ये एक खोलगट दरी अशा एका बाजूच्या डोंगरावर विश्रांतीसाठी बसलो होतो. तेव्हा आमच्या गटातील एकाने पद्मासन घालून ओंकार नाद चालू केला. त्यानंतर तेथील वातावरण एकदम पालटून गेले. त्या वेळी मलाही ‘ध्यान लावावे’, असे वाटले.
३. ध्यान लावल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विराट चरण खोल दरीमध्ये दिसणे, तेथील सृष्टीने तेथे उपलब्ध असलेल्या सर्व फुलांचा गुुरुचरणी अभिषेक करणे आणि त्यातून आनंद अन् चैतन्य मिळणे
मी ध्यान लावल्यावर मला प.पू. डॉक्टरांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) विराट रूप दिसू लागले. गुरुदेवांच्या चरणांना स्पर्श करावा; म्हणून मी मनाने गुरूंच्या चरणाजवळ जाऊ लागलो. त्यांचे चरण खोल दरीमध्ये होते. ‘खाली खडक आणि काटेरी झाडे-झुडपे असल्याने गुरुदेवांच्या चरणांना इजा होईल’, असे मला वाटले; मात्र तेथील वृक्ष माझ्याकडे स्मितहास्य करून मला सांगू लागले, ‘गुरुदेवांच्या चरणी आम्ही मऊ पानांच्या फांद्या पसरल्या आहेत. त्यांना काहीही इजा होणार नाही.’ तेव्हा ‘गुरुदेवांच्या अस्तित्वाने तेथील सर्व सृष्टी आनंदी झाली आहे’, असे मला जाणवले. मी मनाने गुरुदेवांच्या चरणांसमोर नमस्कार मुद्रेमध्ये बसलो होतो. तेथील सृष्टीने त्या वातावरणात जितकी फुले होती, ती सर्व फुले गुरुदेवांना अभिषेक म्हणून घालायला आरंभ केला. मीही त्या निसर्गरूपी अभिषेक सोहळ्यामध्ये हरवून गेलो. त्यातून मला आनंद आणि चैतन्य याची जाणीव होत होती. हा आनंदसोहळा मी अनुमाने १५ – २० मिनिटे अनुभवला.
४. गुरुदेवांच्या अभिषेकासाठी घारी येणे
थोड्या वेळाने मी हळूहळू माझे डोळे उघडायला आरंभ केला. पुढे पहातो, तर अकस्मात् १२ – १५ घारी घिरट्या घालत होत्या. जणूकाही गुरुदेवांच्या अभिषेकासाठी त्या तेथे आल्या होत्या.
५. तुकाईदेवीनेही आनंद सोहळा अनुभवणे
यावरून मला लक्षात आले की, ही केवळ कल्पनाच नाही, तर प्रत्यक्ष हा सोहळा तेथे चालू होता. तेथील तुकाईदेवीनेही हा आनंदसोहळा अनुभवला आणि ती पुष्कळ आनंदी होती.’
– श्री. जितेंद्र राठी, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (३१.५.२०२२)
|