साधकाच्या पोटात तीव्र वेदना होत असतांना त्याने अनुभवलेली सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सर्वज्ञता !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. साधकाच्या मणिपूरचक्राखाली उजवीकडे एक इंच ते स्वाधिष्ठान चक्रापर्यंत सुया टोचल्याप्रमाणे वेदना होऊ लागणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारणे

‘२.१०.२०२१ या दिवशी दुपारी ३.२० वाजता मी खोलीत विश्रांती घेत असतांना माझ्या मणिपूरचक्राखाली उजवीकडे एक इंच ते स्वाधिष्ठान चक्रापर्यंत सुया टोचल्याप्रमाणे वेदना होऊ लागल्या. तेव्हा माझ्या मनात ‘या वेदना आंत्रपुच्छ किंवा मूतखडा यांच्याशी संबंधित असू शकतात’, असा विचार आला. मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. सद्गुरु गाडगीळकाकांनीही माझ्यासाठी नामजपादी उपाय केले. ते नामजपादी उपाय करत असतांना त्यांना आणि मला ढेकरा येत होत्या. तेव्हा ‘माझा त्रास बाहेर पडत आहे’, असे मला वाटले; मात्र मला होत असलेल्या वेदनांची तीव्रता तशीच होती.

२. साधकाला तीव्र वेदना होत असतांना त्याच्या मनात सकारात्मक विचार येऊन त्याला कृतज्ञता वाटणे

प्रा. महावीर श्रीश्रीमाळ

अ. मला वेदना होत असतांना २ साधकांची आठवण आली. माझ्या मनात ‘त्यांना मूतखड्याचा त्रास होत असतांना आणि अशा वेदना होत असतांना त्यांनी ते कसे सहन केले असेल ?’, असा विचार आला. माझ्या डोळ्यांसमोर त्या साधकांचे हसरे चेहरे आले. मला त्यांचे हसरे चेहरे दिसल्याने, तसेच त्यांच्या विचाराने मला माझ्या वेदनांचा काही मिनिटे विसर पडला.

आ. त्यानंतर माझ्या मनात ‘मातृशक्ती (महिला) अपत्याला जन्म देतांना प्रसुती वेदना कशी सहन करत असेल ?’, हा विचार आला आणि माझ्या मनात कृतज्ञताभाव निर्माण झाला.

इ. ‘आपत्काळ आणि युद्धकाळ यांत विविध कारणांनी मानवाला अशा प्रकारच्या तीव्र वेदना होऊ शकतील. ईश्वर माझ्याकडून त्याला सामोरे जाण्याची पूर्वसिद्धता करून घेत आहे’, असे वाटून माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

३. ‘सकारात्मक किंवा नकारात्मक प्रसंगात शिकण्याची स्थिती, इतरांचा विचार आणि कृतज्ञताभाव असेल, तर स्वतःचा विसर पडून स्थिर रहाता येते’, हे लक्षात येणे

मला तीव्र शारीरिक वेदना होत असूनही आरंभी १० ते १२ मिनिटे माझी शिकण्याची स्थिती होती. त्यामुळे त्या वेदनांचा मला त्रास झाला नाही. त्यानंतर मात्र माझे वेदनांकडे लक्ष जाऊन मला रडू आले. त्या वेळी सहसाधकाने माझ्या पायावरून हात फिरवला. तेव्हा माझ्या मनात ‘तो गुरुदेवांचाच हात आहे’, असा विचार येऊन माझे रडणे थांबले. तेव्हा ‘प्रसंग सकारात्मक किंवा नकारात्मक असो, त्यात शिकण्याची स्थिती, इतरांचा विचार आणि कृतज्ञताभाव असेल, तर स्वतःचा विसर पडून स्थिर रहाता येते’, हे माझ्या लक्षात आले.

४. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांची सर्वज्ञता आणि त्यांच्यातील चैतन्याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त होणे

मला होणार्‍या त्रासाविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे मूत्रविसर्जनात अडथळा निर्माण झाला आहे.’’ माझ्यासाठी नामजपादी उपाय शोधतांना मला होणार्‍या वेदना सद्गुरु काका स्वतः अनुभवत होते. नामजपादी उपाय आणि वेदनाशामक इंजेक्शन यांमुळे मला काही मिनिटानंतर हलके वाटू लागले. त्याच वेळी सद्गुरु काकांनाही हलके वाटले. तेव्हा संतांची सर्वज्ञता आणि त्यांच्यातील चैतन्याची जाणीव होऊन माझी सद्गुरु काकांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

हे गुरुदेवा, ‘आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी आपल्या अनुसंधानात राहून स्थिर कसे रहायचे ?’, हे आपल्या कृपेने मला शिकायला मिळाले. त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, फोंडा, गोवा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक