राज्यशासनाकडून मराठी भाषा संवर्धन पुरस्कारांची घोषणा !

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषाविषयक विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ‘अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार’ मराठी भाषा, व्याकरण, भाषाविज्ञान यांचे अभ्यासक डॉ. प्रकाश परब यांना आणि सीमावर्ती भागात मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी उपक्रम राबवणार्‍या बेळगाव येथील ‘वाङ्मय चर्चा मंडळा’ला घोषित झाला आहे. ‘मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार’ छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. कौतिकराव ठाले पाटील यांना आणि मराठी भाषेच्या प्रसारासाठी विविध साहित्यिक उपक्रम राबवणार्‍या नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानला घोषित करण्यात आला आहे.

वर्ष २०२२ च्या प्रौढ वाङ्मयाच्या २२, बाल बालवाङ्मयाच्या ६, तर प्रथम पुस्तक प्रकाशकांच्या ६ पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली आहे. ‘सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार’ विठ्ठल गावस यांच्या ‘खाणमाती’ या पुस्तकासाठी घोषित करण्यात आला आहे. शासनाच्या मराठी भाषा विभागाद्वारे भाषामंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच या सर्व पुरस्कारांची घोषणा केली.