आळंदी (जिल्हा पुणे) येथील प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण माहिती….
आळंदी येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीमद्भागवत कथा, प्रवचन, कीर्तन, संत आणि मान्यवर यांचा सन्मान असे विविध कार्यक्रम भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडत आहेत. त्याविषयीची संक्षिप्त वृत्तांत जाणून घेऊया…
१. ‘संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ याची प्रचिती देणारा महोत्सव !
भारतातील पुण्यभूमीत संत, ऋषिमुनी आणि तपस्वी यांनी भक्ती, साधना तथा लोककल्याणाच्या तपाने बहरलेला आहे. अनादी काळापासून ही संत परंपरा चालू असून या संतांनी भारताची निर्मितीही केली आहे. वेळोवेळी हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षणही संतांनी केले आहे. त्यानुसार प.पू. गोविंददेव गिरि महाराजही ही दिव्य परंपरा पुढे चालवत आहेत. स्वामीजींचे संपूर्ण जीवन धर्म, संस्कृती आणि समाज तथा राष्ट्राला समर्पित आहे. याअनुषंगाने प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा जन्मोत्सव प्रतिवर्षी ‘गीताभक्ती दिवस’च्या रूपात साजरा केला जातो. यंदा त्यांना ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आळंदी येथे ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या महोत्सवात भारतातून संतांची मांदियाळी येत असल्याने संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे ‘संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ याची आठवण येते. वारकरी शिक्षण संस्थेसमोर असलेल्या १२ एकर भूमीत हा महोत्सव आयोजित केला आहे. येथील कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवातील भाविकांच्या सात्त्विक वेशभूषा, देवतांच्या मूर्ती, स्वच्छता, बैठक व्यवस्था, आदर्श पद्धतीन केलेले संतांचे स्वागत आणि त्यांचा सन्मान, पू. जगद्गुरु द्वाराचार्य स्वामी श्री राजेंद्रदासजी महाराज यांच्या मुखातून चालू असलेली श्रीमद्भागवत कथा, सायंकाळी भावपूर्ण वातावरणात होणारे कीर्तन यांमुळे भाविक भक्तीत न्हाऊन निघत आहेत. या सर्वच गोष्टी भाविकांना आकर्षित करत आहेत, तसेच प्रतिदिन होणारे संतांचे दर्शन, त्यांचे मार्गदर्शन ऐकून भाविकांना होणारा आनंद अवर्णनीय आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी बसून भाविक कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत. ‘हा मंत्रमुग्ध कार्यक्रम कधीच संपू नये’, असेच भाविकांना वाटत आहे.
२. सुंदर आणि आकर्षक अशी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती !
महोत्सवाच्या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि मारुति यांची भव्य, सुंदर आणि आकर्षक अशी मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. मूर्तीसमोर सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळीही काढण्यात आली आहे. या तिन्ही मूर्तींचे संत आिण भाविक मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेऊन त्याची छायाचित्रेही घेत आहेत. ही मूर्ती पाहिल्यानंतर प्रत्यक्षात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि मारुति यांचे महोत्सवाच्या ठिकाणी आगमन झाले आहे, अशी अनुभूती येते. वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशयोजनेमुळे रात्रीच्या वेळी या मूर्ती पुष्कळ आकर्षक आणि सुंदर दिसतात.
३. प्रत्यक्ष संवाद साधणार, असा भाव असणारी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती !
महोत्सवाच्या ठिकाणी श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी यांच्या आकर्षक मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तींचही भाविक प्रतिदिन दर्शन घेत आहेत. मूर्तीसमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे.
४. महोत्सवात ग्रंथ प्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना गीता परिवाराच्या ‘महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान’चे कार्यदर्शी श्री. दत्ता खामकर म्हणाले, ‘‘महोत्सवातील ग्रंथप्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गीता परिवाराची एकूण ९६ नवीन प्रकाशने प्रकाशित झाली आहेत. यामध्ये श्रीमद्भागवत कथा, रामकथा, विश्वबंधुता, भावगीता, योगवसिष्ठ यांची प्रवचने, भावकथा अशा अनेक ग्रंथांचा समावेश आहे. या सर्व ग्रंथांत गेल्या काही दिवसांत ‘रामकथा आणि योगवसिष्ठ यांची प्रवचने’ या ग्रंथांची सर्वात अधिक विक्री झाली आहे. ग्रंथप्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या ग्रंथांमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तेलगु, तमिळ या भाषेतील ग्रंथ उपलब्ध आहेत. ‘रामकथा’ हा ग्रंथ वाचून अनेक जण प्रवचनकार झाले आहेत.’’
५. गीता परिवाराच्या वतीने १३३ देशांत गीता शिकवली जाते !
श्री. दत्ता खामकर म्हणाले, ‘‘महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानच्या वतीने जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत गीता कथा कार्यक्रम आयोजित केले जाते. गीता परिवाराच्या वतीने एकूण १३३ देशांत गीता शिकवली जाते. आमच्या एकूण ३७ वेदपाठशाळा आहेत. यामध्ये ८० अध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली १ सहस्र १३० विद्यार्थ्यांना निःशुल्क आणि त्यांना सर्व सुविधा देऊन शिक्षण दिले जात आहे. गरीब आणि निराधार लोकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरवली जाते, तसेच शैक्षणिक साहाय्य केले जाते. हे गेल्या ३५ वर्षांपासून चालू आहे. संतश्री ज्ञानेश्वरी गुरुकुलद्वारे दीक्षार्थी गुरुजींचे वर्षांतून एकदा ऋषीकेश येथे ‘गीता साधना शिबिर’ घेतले जाते. यामध्ये देशातील ३५० साधक सहभागी असतात. गुरुकुलाद्वारे वारकरी छात्रांसाठी ‘माधुकरी’ आळंदी आणि वृंदावन येथे आयोजित केली जाते. ‘ज्ञानेश्वरी कन्या वात्सल्यधाम, राधा वात्सल्यधाम, पुणे येथे गोविंद बालसंस्कार केंद्र चालू आहे. यामध्ये घरकाम करून उदरनिर्वाह करणार्या कुटुंबांच्या मुलांना शिक्षण दिले जाते, तसेच निराधार मुलांसाठी १५ वर्षांपासून शिक्षण चालू केले आहे. ब्राह्मणेतर समाजातील मुलांसाठी विनामूल्य शिक्षण आणि इतर सुविधा मिळण्यासाठी विविध सामाजिक संस्थांना गीता परिवाराच्या वतीने ५० टक्के साहाय्य दिले जाते.
६. महोत्सवाच्या मुख्य मंडपावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी !
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. ही पुष्पवृष्टी जवळजवळ १० ते १५ मिनिटे चालू होती. हे पाहून भाविकांनी आनंदाने टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला.