नाशिक – वारकरी महामंडळ नाशिक जिल्हा यांच्या वतीने सनातनचे साधक तथा महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळाचे उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांना शाल, श्रीफळ आणि संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराजांची प्रतिमा देण्यात आली.
निफाड येथे कार्यरत असलेले श्री. नीलेश नागरे यांनी कीर्तन, प्रवचन, भजन या माध्यमांतून सर्वांमध्ये अध्यात्माविषयी जनजागृती केली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण आस्थापनाच्या शेतीपंपाचे, तसेच घरगुती वाणिज्य आणि औद्योगिक वीजदेयक भरण्याचे महत्त्व सर्व शेतकरी बांधव आणि कार्यक्रमातील ग्राहक यांना समजावून सांगून वीजदेयक भरून घेतले. ‘अध्यात्म’ या विषयावर प्रत्येक वेळी मार्गदर्शन करून लोकांना साधना करण्यासाठी साहाय्य केले. यासाठी त्यांना सत्कार करण्यात आला.
सत्काराचे सर्व श्रेय त्यांनी त्यांचे गुरु, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीकृष्ण, पांडुरंग यांना अर्पण केले.
सत्कार प्रसंगी ह.भ.प. चेतन महाराज नागरे, ह.भ.प. विश्वनाथ अण्णा वाघ महाराज, ह.भ.प. लहू महाराज आहिरे, ह.भ.प. दत्तू पाटील डुकरे महाराज, ह.भ.प. सुभाष महाराज बच्छाव, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लवित्कर, ह.भ.प. रावसाहेब पाटील जाधव, ह.भ.प. चंद्रकांत दादा आहेर महाराज उपस्थित होते.