इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नसले, तरी इम्रान खान यांचे समर्थक असणारे अपक्ष उमेदवार १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत, तर नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाला ७१ आणि बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाला ५३ जागांवर आघाडी मिळाली आहे. येथे एकूण ३३६ जागा आहेत. त्यांपैकी २६५ जागांवर निवडणूक झाली. एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. उर्वरित ७० जागा राखीव आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी १३४ जागांवर बहुमत असणे आवश्यक आहे. या मतमोजणीत हेरफेरी करण्यात आल्याचा आरोप सर्वच पक्षांनी केला आहे.
इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, आमच्या पक्षाचे उमेदवार रात्री विजयाच्या दिशेने वाटचाल करत होते; परंतु सकाळ होताच अनेक उमेदवारांचा पराभव झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणुकीत घोटाळा झाला तरीही आम्ही मागे हटणार नाही. आम्हाला १५० हून अधिक जागा मिळतील. आम्हाला दडपता येणार नाही. आम्ही रस्त्यावर, न्यायालयात लढू. कार्यकर्त्यांना भीती घातली गेली. त्यांना धमक्या दिल्या गेला, काहींना कारागृहात डांबले; परंतु आमच्या आशा मावळलेल्या नाहीत. आमच्या पक्षाचे लोक नवाझ शरीफ किंवा बिलावल भुत्तो यांच्यासमवेत जाणार नाहीत.