JNU Clashes : जे.एन्.यू.मध्ये साम्यवादी आणि अभाविप संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

धारदार शस्त्रांचा वापर झाल्याचा अभाविपचा आरोप

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालय म्हणजे जे.एन्.यू.च्या आवारात ९ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) आणि साम्यवादी विचारसरणीचे विद्यार्थी यांच्यामध्ये हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील विद्यार्थी घायाळ झाले. या विश्‍वविद्यालयात यावर्षी विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानिमित्त येथील साबरमती धाब्यावर विश्‍वविद्यालयाच्या सर्वसाधारण सभेला सर्व विद्यार्थी गट आले होते. यामध्ये निवडणूक आयोगाचे सदस्य निवडण्यावरून चर्चा झाली. त्या वेळी ही हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यामध्ये विद्यार्थी घोषणाबाजी करत एकमेकांशी वाद घालतांना दिसत आहेत. येथील सुरक्षारक्षक हस्तक्षेप करतांना दिसत आहेत. विश्‍वविद्यालय प्रशासनाकडून या घटनेविषयी अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

सौजन्य : TV9

१. ‘डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन’च्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर आक्रमण केल्याचा आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थी प्रशांतो बागची आणि दिव्या प्रकाश या दिव्यांग (विकलांग) विद्यार्थिनीला मारहाण करण्यात आली. विद्यार्थी प्रफुल्ल याच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण करण्यात आले.

२. या प्रकरणाविषयी देहलीच्या पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, रात्री १२.३० वाजता विश्‍वविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाने दूरभाष करून तक्रार केली होती. यानंतर पोलीस पथक विश्‍वविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोचले; पण आत गेले नाहीत. पोलिसांना केवळ अभाविपची तक्रार प्राप्त झाली आहे. विश्‍वविद्यालयाकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. पोलीस जे.एन्.यू. प्रशासनाच्या संपर्कात असून या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

जे.एन्.यू.मधील देशविरोधी आणि हिंदुविरोधी साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा बंदोबस्त करण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याने अशा विश्‍वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे !