निखिल वागळे यांच्या निर्भय सभेविरुद्ध भाजपची पुणे येथे निदर्शने !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्याचे प्रकरण

निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेला हल्ला

पुणे – येथे ९ फेब्रुवारी या दिवशी निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण होते. भाजपने आंदोलन करत सभा होऊ देणार नाही, अशी चेतावणी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निखिल वागळे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी भाषणाला अनुमती नाकारावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, तसेच देवधर यांनीही पुणे पोलिसांकडे केली.

निखिल वागळे यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीनेही आंदोलन केले.

यासंदर्भात पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी घाटे यांच्यासह सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, राहुल भंडारे, राघवेंद्र मानकर माजी नगरसेवक महेश वाबळे, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

निखिल वागळेंची गाडी फोडली !

पुणे – येथील ‘साने गुरुजी हॉल’मध्ये ९ फेब्रुवारीला ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निखिल वागळे यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन येत असतांना खंडूजी बाबा चौक येथे भाजपकडून निखिल वागळेंची गाडी फोडण्यात आली. गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली.