श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशात विविध ठिकाणी पार पडले श्रीराम नामसंकीर्तन !

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर, भोपाळ, इंदूर आणि जबलपूर या ठिकाणी ‘श्रीराम नामसंकीर्तना’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्रीरामाचा सामूहिक नामजप, प्रार्थना, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.

भोपाळ

श्रीराम मंदिर, छत्रसाल नगर (फेज-२) येथे १५ ते २१ जानेवारी या कालावधीत श्रीराम नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात सनातन संस्थेचे श्री. गिरीश आगरकर यांनी श्रीरामाच्या चारित्र्याचे विविध पैलू उलगडून दाखवले. हे पैलू प्रतिदिन श्रीरामनामाचा जप करून स्वतःमध्ये कसे आत्मसात् करावे, याविषयी सांगितले. प्रतिदिनच्या या कार्यक्रमात अनेक भाविक सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी मंदिराचे अध्यक्ष श्री. शिवनारायण शर्मा यांनी अनुमती दिली. कार्यक्रमासाठी मंदिराचे पुजारी श्री. हरिप्रसाद शर्मा, भाविक श्री. राकेश तिवारी, श्री. सी.पी. सिंह आदींचे योगदान लाभले.

श्रीराम नामसंकीर्तन सप्ताहात नामजप करतांना भाविक

अभिप्राय

 १. श्री. राकेश तिवारी : नामसंकीर्तनासमवेतच प्रभु श्रीरामाचे गुण, श्रीरामरक्षास्तोत्र आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता यांविषयी सुंदर अन् प्रेरणादायी माहिती मिळाली.

२. श्री. एस्.आर्. बिलवार आणि डॉ. के.पी. सिंह बुंदेला : हा कार्यक्रम अतिशय लाभदायक ठरला. भविष्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे.

श्रीरामाचा जप

 ग्वाल्हेर

ग्वाल्हेरमधील लष्कर, महाराजा बडा येथील दत्त मंदिरात सामूहिक नामसंकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. वैदेही पेठकर यांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले, तसेच श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्रीरामाचा जप करण्यात आला. या वेळी अनेक भाविक उपस्थित होते.

त्याचप्रमाणे लष्कर, ग्वाल्हेर येथील मधुवन अपार्टमेंटमध्ये झालेल्या कार्यक्रमात सामूहिक नामजप, श्रीरामरक्षास्तोत्र, सामूहिक प्रार्थना आणि रामराज्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी श्री. विवेक पेठकर यांनी ही प्रतिज्ञा सांगितली. या वेळी ‘सनातन संस्थेचे साधक अतिशय चांगले नियोजन करतात’, असे उपस्थितांनी सांगितले.

अभिप्राय 

१. श्री. सौरभ गोयल : न्यूनतम तापमान असतांनाही मी ‘या कार्यक्रमाला यायचेच’, असे ठरवले होते. कोणत्याही परिस्थितीत सनातन संस्थेचे साधक वेळेवर उपस्थित रहातात. मीही त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो.

२. श्री. अमित श्रीवास्तव : मी नामजपाला प्रारंभ केल्यानंतर माझ्या पाठीत तीव्र वेदना होऊ लागल्या. काही वेळाने माझे ध्यान लागले. त्यानंतर केवळ नामजपाचा आवाज ऐकू येत होता. मन शांत आणि एकाग्र झाले होते.

 इंदूर

इंदूरच्या तुळशीनगर येथील श्री सरस्वती मंदिरामध्ये रामराज्याची स्थापना व्हावी, यासाठी श्रीराम नामसंकीर्तन, तसेच सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. मातंगी तिवारी यांनी श्रीरामाच्या नामजपाचे महत्त्व आणि त्यांचे गुण सांगितले. या कार्यक्रमासाठी मंदिराच्या अध्यक्षा सौ. शारदा सिंह यांचे सहकार्य लाभले.

वैशिष्ट्यपूर्ण : कु. कीर्ती खोलापुरे आणि सौ. शारदा सिंह यांच्या सहकार्याने रा.स्व.  संघाच्या महिला शाखेने श्रीरामाचे गुण, वैशिष्ट्ये आणि रामनामाच्या जपाचे महत्त्व सांगून कारसेवकांच्या मुक्तीसाठी प्रार्थना केली.

 जबलपूर

जबलपूरमधील नूतन मराठी विद्यालयात श्रीराम नामसंकीर्तन अभियान घेण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. संजना गणोरकर यांनी विद्यार्थ्यांकडून सामूहिक नामजप आणि प्रार्थना करून घेतली. या अभियानाला शाळेतील ५० विद्यार्थी आणि १० शिक्षक उपस्थित होते. यासाठी महाराष्ट्र शिक्षण मंडळ समितीचे अध्यक्ष श्री. प्रदीप फाटक, उपाध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर, सदस्य सर्वश्री अनिल राजूरकर आणि मनोज चौधरी यांचे सहकार्य लाभले.

ग्वाल्हेर आणि भोपाळ येथे विविध ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा

१. ग्वाल्हेर येथील ए.बी. मार्गावरील श्री गजानन मंदिरामध्ये श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नामफेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरीच्या नंतर उपस्थित भक्तांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा केली. या वेळी अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. श्री गजानन मंदिराचे अध्यक्ष श्री. वसंत कुंटे यांनी ‘यापुढे आम्ही संस्थेच्या संपर्कात राहू’, असे सांगितले.

२. भोपाळ येथील सागर लेक व्ह्यू सोसायटीमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी सोसायटीमधील अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. सोसायटीमधील सर्व लोकांचे चांगले सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी अधिवक्ता गजानन दाबळी यांनी प्रयत्न केले.