‘महाराणा प्रताप एक सहस्र वर्षांचे धर्मयुद्ध’ पुस्तकाचे पुणे येथे झाले प्रकाशन !
पिंपरी (जिल्हा पुणे) – महाराणा प्रताप यांचा खरा इतिहास जगापुढे आणण्यासाठी मी ‘महाराणा प्रताप एक सहस्र वर्षांचे धर्मयुद्ध’ हे पुस्तक लिहिले आहे. महाराणा प्रताप हे हलदी घाटीचे युद्ध हरले, हा चुकीचा इतिहास आहे. महाराणा प्रताप यांनी ५६ लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. आता महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचा इतिहास लिहिणार्यांनी दुरुस्ती करावी आणि खरा इतिहास लिहावा, असे आवाहन ‘महाराणा प्रताप एक सहस्र वर्षांचे धर्मयुद्ध’ या पुस्तकाचे मूळ लेखक डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी केले. लेखक डॉ. ओमेंद्र रत्नु यांनी लिहिलेल्या आणि चारूचंद्र उपासनी यांनी मराठी अनुवाद केलेल्या या पुस्तकाच्या २५ व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा ४ फेब्रुवारी या दिवशी येथील आर्य समाज पिंपरी कॅम्प येथे झाला.
या वेळी आर्य समाज पिंपरी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, भाजपचे शहर अध्यक्ष शंकर जगताप, ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, मराठी अनुवादक चारुचंद्र उपासनी, पंडित धर्मवीर आर्य आदी उपस्थित होते.
ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले की, महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकवला जावा, तसेच या महान व्यक्तींच्या आत्मचरित्रांचे घरोघरी पारायण झाले पाहिजे.
महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर हिंदुस्थानचे इस्लामीकरण झाले असते ! – चारुचंद्र उपासनी, लेखक
चारुचंद्र उपासनी यांनी सांगितले की, सत्य इतिहास सांगणारे हे दुर्मिळ पुस्तक आहे. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर हिंदुस्थानचे इस्लामीकरण झाले असते. सर्व देशवासियांनी हे पुस्तक वाचून खरा इतिहास नव्या पिढीला सांगितला पाहिजे, तरच वैचारिक आक्रमण रोखता येईल.