भारताचा अमेरिकेच्या नेतृत्वावर विश्‍वास नाही ! – निक्की हेली, अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या नेत्या

अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांचा अमेरिकेला घरचा अहेर !

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताला आमच्यासमवेत भागीदार व्हायचे आहे. त्याला रशियाशी भागीदारी करायची नाही. भारताचा अमेरिकेच्या नेतृत्वावर विश्‍वास नाही, ही अडचण आहे, असे विधान भारतीय वंशाच्या अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांनी केले आहे. ‘फॉक्स बिझनेस न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. अमेरिकेने भारताला रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याची अनुमती दिल्याविषयीच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना त्यांनी वरील विधान केले.

सौजन्य Business Standard 

“‘भारत अमेरिकेला दुर्बल समजतो. भारताने नेहमीच हुशारीने काम केले आहे. तोे रशियाच्या जवळ रहातो; कारण त्याला त्याच्याकडून सैनिकी उपकरणे मिळतात. अमेरिकेला स्वतःच्या दुर्बलतेवर मात करण्याची आवश्यकता आहे.’ – निक्की हेली”

निक्की हेली पुढे म्हणाल्या की,

१. युक्रेन आणि त्याच्या मित्रराष्ट्रांनी जगभरातील देशांना रशियापासून दूर रहाण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करूनही मध्य आशियाई राष्ट्रांनी भारताकडून तेलाची खरेदी केली. रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रारंभीच पाश्‍चात्त्य देशांनी रशियाच्या तेलाच्या आयातीत कपात केली होती, तर व्हाईट हाऊसच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, भारतासह प्रत्येक सार्वभौम देशाला कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्याचा अधिकार आहे.

२. अमेरिकेने हे मान्य केले पाहिजे की, त्याच्यात काही त्रुटी आहेत. तेव्हाच गोष्टी चांगल्या होतील. आम्हाला युती निर्माण करण्यास प्रारंभ करावा लागेल.

३. भारत आणि जपान यांनी चीनवरील त्यांचे अवलंबित्व अल्प करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

संपादकीय भूमिका 

भारताने अमेरिकेवर विश्‍वास ठेवावा, असे अमेरिकेने भारतासाठी काय केले आहे ? अमेरिकेने गेल्या ७५ वर्षांत भारतविरोधी निर्णय घेतले आहेत आणि आताही घेत आहे. अमेरिकेने भारताशी मैत्री करण्याच्या नावाखाली विश्‍वासघात करण्याच्या पलीकडे काहीच केलेले नाही !