‘एक कर्तव्यदक्ष हिंदु काय करू शकतो ? एकटा किती वर्षे लढा लढू शकतो ? याचे एक ज्वलंत उदाहरण, म्हणजे पांडवकालीन लाक्षागृहाची स्वाधीनता ५ फेब्रुवारी २०२४ या दिवशी पुन्हा हिंदूंना मिळाली. दुर्दैवाने तो एकटा हिंदु कोणत्याही संघटनेशी अथवा हिंदुत्वनिष्ठ पक्षाशी संबंधित नसल्याने या बातमीला फारसे कुणी महत्त्व दिले नाही अथवा त्यांचा गौरव फारसा झाला नाही.
१. कुणी दिला लाक्षागृह भूमीचा लढा ?
आचार्य कृष्णाशास्त्री ब्रह्मचारी नावाच्या एका विद्वानाने आणि त्यांच्या पुढील वारसांनी वर्ष १९७० पासून हा लढा जवळपास ५३ वर्षे न्यायालयात लढा लढून पांडवकालीन लाक्षागृह हे स्थान यवनी (मुसलमानांच्या) दास्यातून मुक्त केले. उत्तरप्रदेशमधील बागपतजवळ लाक्षागृह टिला नावाचे स्थान आहे. कौरवांनी पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्यासाठी जी योजना आखली, ते हे स्थान आहे. ही जागा किती होती, ते लक्षात घ्या. १ बिघा, म्हणजे २.३० गुंठे, अशी १०० बिघा भूमी (पावणे सहा एकर) आहे.
मुकीम खान नावाच्या एका गृहस्थाने हे स्थान, म्हणजे आमचे कब्रस्तान आणि ‘बद्रुद्दिन’ नावाच्या सुफी संतांच्या मजारीचे (इस्लामी पीराचे थडगे) ठिकाण आहे’, असा दावा केला. त्या वेळी आचार्य कृष्णाशास्त्री ब्रह्मचारी यांनी त्याला आव्हान दिले आणि त्या जागेत ‘हिंदु मंडळी हे गुरुकुल अन् गोशाळा चालवत आहेत’, असे सांगितले.
२. पुरातत्व विभागाचे खोदकाम आणि न्यायालयाचा निर्णय
पुरातत्व विभागाने ही जागा संरक्षित केली होती. वर्ष १९५३ मध्ये पुरातत्व विभागाने तेथे खोदकाम केले होते. त्या वेळी त्या खोदकामात जवळपास ४ सहस्र ५०० वर्षे आधीच्या वस्तू मिळाल्या होत्या. त्या आजही भारतीय पुरातत्व विभागाजवळ जमा आहेत. तरीसुद्धा धर्मांधांनी तिथे अनधिकृतपणे मजार उभारली आणि ही जागा गिळंकृत करण्यास आरंभ केला. वक्फ बोर्डाने ‘ही जागा आमची आहे’, असा दावा केला होता. शास्त्रीजींनी मात्र ठाम विरोध करून आधी बागपत न्यायालय आणि पुढे मेरठ न्यायालय येथे हा लढा लढला अन् आज ५३ वर्षांपेक्षा अधिक काळाने ‘लाक्षागृहाची जागा ही हिंदूंचेच तीर्थक्षेत्र आहे’, असे न्यायालयाने सर्व साक्षी पुरावे आणि विविध सर्वेक्षण यांनुसार मान्य केले.
लक्षात ठेवा सर्वसामान्य माणूसही लढा लढून जिंकू शकतो. फक्त आपला देव, देश आणि धर्म यांवर विश्वास हवा. त्यामुळे आपण आचार्य कृष्णाशास्त्री ब्रह्मचारी यांचे स्मरण करून धन्यवाद देऊया.’
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. (५.२.२०२४)