Bowel Cancer Vaccine : ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या डॉक्टराने बनवली आतड्यांसंबंधीच्या कर्करोगाची पहिली लस !

  • लवकरच केली जाणार चाचणी !

  • शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता भासणार नाही !

डॉ. टोनी धिल्लोन

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील भारतीय वंशाचे सुप्रसिद्ध डॉक्टर टोनी धिल्लोन हे आतड्यांच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण बनले आहेत. आतड्याच्या कर्करोगावर लस बनवण्यासाठी त्यांनी ४ वर्षे काम केले आहे. येणार्‍या काळात या लसीची चाचणी केली जाणार आहे.

१. डॉ. टोनी धिल्लोन हे रॉयल सरे एन्.एच्.एस्. फाऊंडेशन ट्रस्टचे ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोगावर उपचार करणारे डॉक्टर) आहेत. त्यांनी या लसीची चाचणी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातील प्रोफेसर टिम प्राइस यांच्यासमवेत त्यावर काम केले आहे.

२. ऑस्ट्रेलियातील डलेड येथील रॉयल सरे आणि साऊथॅम्प्टन विद्यापिठातील कॅन्सर रिसर्च क्लिनिकल ट्रायल्स युनिटद्वारे ही चाचणी केली जाईल. क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल यासाठी सहकार्य करणार आहे.

‘कोणत्याही आतड्याच्या कर्करोगावरील ही पहिली लस आहे. आम्हाला आशा आहे की, ती यशस्वी होईल. त्यामुळे अनेक रुग्णांच्या शरिरातून हा कर्करोग पूर्णपणे नाहीसा होणार आहे. रुग्णांना शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता भासणार नाही.’ – डॉ. टोनी धिल्लोन

४४ रुग्णांवर लसीची चाचणी केली जाणार !

चाचणीमध्ये ४४ रुग्णांचा समावेश केला जाईल. लसीवरील अभ्यास १८ मास चालेल. ही चाचणी ऑस्ट्रेलियातील ६ आणि ब्रिटनमधील ४ ठिकाणी असणार्‍या रुग्णांवर घेतली जाईल. चाचणी यशस्वी झाल्यास लस वापरण्यासाठी अनुज्ञप्ती (परवाना) दिला जाईल किंवा त्यावर मोठा अभ्यास केला जाईल. जगभरात प्रतिवर्षी आतड्यांसंबंधी कर्करोगाची १२ लाख प्रकरणे आढळतात. आतड्यांच्या कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण ५० टक्के आहे.