संपादकीय : ‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी !

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वाेच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला. भाजपच्या आघाडीच्या नेतृत्वापैकी ते एक होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा आणि लोकसभा खासदार, केंद्रात माहिती आणि प्रसारण विभागाचे मंत्री, गृहमंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. असे असले, तरी लालकृष्ण अडवाणी यांची देशवासियांना ओळख आहे, ती त्यांनी काढलेल्या सोमनाथ ते अयोध्या श्रीरामजन्मभूमीमुक्ती रथयात्रेमुळे ! ज्या वेळी म्हणजे ९० च्या दशकात भारतीय काँग्रेसची कारकीर्द जोमात होती, ज्या वेळी ‘हिंदु’ शब्द उच्चारणे हा एखादा अपराध समजला जाई, त्या वेळी श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेली घोषणा ही समस्त हिंदु समाजाच्या अंतर्मनातील रामभक्तीला साद घालणारी ठरली. श्रीरामजन्मभूमीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतांना जाहीररित्या त्यासाठी रथयात्रा काढण्याचे अडवाणी यांचे धैर्य कौतुकास्पद होते. त्यांची ही यात्रा देशभर गाजली. अनेकांना या यात्रेच्या माध्यमातून श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी आपण प्रयत्न करू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला.

काँग्रेसच्या हिंदु समाजाप्रती असलेल्या घृणेला खरे तर रथयात्रेने उत्तर दिले. अनेक आव्हाने रथयात्रेच्या मार्गात आली; मात्र अडवाणींनी त्यावर नेटाने मात केली. त्यांच्या बिहार राज्यातील अटकेने यात्रा थांबली, तरी देशभरातील रामभक्तांना जागे केले. त्यानंतर २ वर्षांनी काय झाले ? ते जगजाहीर आहेच. भारतरत्न अडवाणी यांचे विविध प्रकारे योगदान आहेच, त्याविषयी दुमत नाही; मात्र त्यांनी श्रीरामजन्मभूमीचे आंदोलन हाती घेतले नसते, तर श्रीराममंदिराच्या पायाभरणीचा, रामलला मंदिरात विराजमान होण्याचा दिवस भारतियांना लवकर पहाता आला नसता. त्यांच्यामुळे हिंदूंचे एक भक्कम संघटन झाले, हिंदूंच्या प्रदीर्घ झोपलेल्या इच्छाशक्तीला अडवाणींनी खरे तर ललकारले होते. लढवय्या हिंदु समाजाला पराक्रम दाखवण्याची प्रेरणा अडवाणींनी दिली होती. याचा प्रभाव केवळ बाबरी ढाचा पडण्यापर्यंतच राहिला नाही, तर काँग्रेसचे सरकार पडण्यापर्यंत झाला. हिंदूंच्या भावना पायदळी तुडवणारी, हिंदूंना न्यून लेखणारी आणि धर्मांधांचे लांगूलचालन करणारी काँग्रेस बहुसंख्य हिंदूंच्या मतांवरच वारंवार निवडून येत होती. अडवाणींनी हिंदुत्व प्रधान ठेवून केलेल्या राजकारणामुळे हिंदूंना दिशा मिळाली आणि हिंदूंनी भाजपला भरभरून मते देऊन केंद्रात भाजपचे सरकार आणले. ‘हिंदुत्व केंद्रीत राजकारणाला खरे तर अडवाणी यांच्यापासून प्रारंभ झाला’, असे म्हणायला हरकत नाही; कारण त्यापूर्वी असे विषय फार तुरळक प्रमाणात होते.

आज भव्य दिव्य श्रीराममंदिर दिमाखात उभे आहे. याचे बरेचसे श्रेय अडवाणी यांना द्यावे लागेल ! वयोमानामुळे ते भारतीय राजकारणातून तसे निवृत्त झाले असले, तरी त्यांना ‘भारतरत्न’ देऊन भारत शासनाने त्यांच्या कारकीर्दीचा सन्मानच केला आहे. अडवाणी यांच्याविषयी भारतीय समाज नेहमी ऋणी राहील.

‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी यांनी श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी दिलेल्या लढ्याविषयी भारतीय समाज नेहमीच त्यांचा ऋणी राहील !