पतित पावन संघटनेने महाराष्ट्रातील १२६ पोलिसांना न्याय मिळवून दिला !

कोल्हापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या ‘पोलीस उपनिरीक्षक मर्यादित उपविभागीय स्पर्धा परीक्षा २०१६’ मधील खुल्या प्रवर्गातील १२६ गुणवत्ताधारकांना नाशिकच्या ‘महाराष्ट्र ट्रेनिंग अकॅडमी’मध्ये प्रशिक्षणासाठी पाठवावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. हे प्रकरण पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या सूत्रावरून अडकल्याने या १२६ जणांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले नाही. त्यामुळे या पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या गुणवत्ताधारकांच्या वतीने पतित पावन संघटनेच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यात आला आणि प्रशिक्षणाचे पत्र मिळवून दिले.

यात पतित पावन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. महेश उरसाल, जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. हे सर्व उमेदवार नाशिक येथील ‘महाराष्ट्र ट्रेनिंग अकॅडमी’कडे रवाना झाले आहेत. प्रशिक्षणावरून आल्यावर पतित पावनमधील आणि यात न्याय मिळवून देण्यात सहभागी असलेल्यांचा १२६ जणांच्या गटाच्या वतीने मोठा सत्कार करण्याचा मानस कोल्हापूर पोलीस दलातील श्री. नारायण पाटील आणि श्री. दीपक वागवे यांनी व्यक्त केला.