१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन !
बीड – कलाकार ३ घंटे ‘मेकअप’ (रंगभूषा) करतात; पण आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ‘मेकअप’ करतो. ‘मुंबई-गौहत्ती व्हाया सूरत’ नाटकात मी होतो. बारामती ते मंत्रालय नाटकात धनंजय मुंडेंचा सहभाग होता. ‘मी पुन्हा येईन’ नाटकही आधी रचले गेले होते, असे सत्य आणि मिश्कील वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद्घाटन झाले.
सामंत या वेळी म्हणाले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन एखाद्याला ताकद कशी दिली पाहिजे ? हे मी मुंडेंकडून शिकलो.
मुंडे या वेळी म्हणाले, ‘‘आयुष्यात अनेक कार्यक्रम केले, असंख्य नाटके पाहिली. आयुष्यात आलेली अनेक नाटके भोगली; पण विभागीय नाट्यसंमेलनाचे उद्घाटन करण्याची संधी जीवनात पहिल्यांदाच मिळाली.’’
धनंजय मुंडे शाब्दीक कोटी करत म्हणाले की, २५ वर्षांपासून प्रशांत दामले यांच्या चेहर्यात फरक पडलेला नाही. प्रयोग करतांना जे कधीच नाही दमले नाहीत ते दामले. तुम्ही पडद्यावर नाटक करता. आम्ही पडद्यामागे करतो. आमचे जीवन हाही एक रंगमंच आहे.