सेवानिवृत्त शिक्षक अशोक धनावडे यांचे गौरव सोहळ्यातील उद्गार
चिपळूण – खडतर कष्ट घेऊन शिक्षक झालो आणि स्वत:च्या ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना करून दिला. त्यामुळे आज अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत. या विद्यार्थ्यांचा उपयोग गावासाठी करून घ्यायला हवा. ग्रामीण भागांतील मराठी शाळा बंद होता कामा नयेत. गावागावांतील शाळा वाचल्या पाहिजेत, असे उद्गार सेवानिवृत्त शिक्षक अशोक धनावडे यांनी त्यांच्या गौरव सोहळ्यात काढले.
तालुक्यातील निरव्हाळ पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा नं. १ येथे माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत आणि शालेय समितीच्या वतीने या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चिपळूणचे माजी नगरसेवक शशिकांत मोदी, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शिंदे, सरपंच मधुकर सावंत, मुख्याध्यापक श्री. तांबीटकर, सर्व शिक्षक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शिंदे यांच्या हस्ते श्री. अशोक धनावडे यांचा गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थींनी मानपत्र, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू दिली. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्तपणे गुरुजींचा या वेळी सन्मान केला.
मनोगत व्यक्त करतांना श्री. धनावडे म्हणाले की,आपण विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी छडी मारली असेल; मात्र ही छडी त्यांच्या भविष्यासाठीच होती.
श्री. शशिकांत मोदी म्हणाले, ‘‘हा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला, हे धनावडेगुरुजी यांचे भाग्य आहे. पूर्ण गाव एकत्र येऊन एखाद्या शिक्षकाचा सेवानिवृत्ती सोहळा अशा पद्धतीने साजरा होत असेल, हे भाग्य एखाद्यालाच मिळू शकते.’’