बेंगळुरू (कर्नाटक) – ‘आपण डेंग्यू, डास, मलेरियाला विरोध करू शकत नाही आणि त्यांना संपवले पाहिजे. तसेच सनातनलाही संपवावे लागेल’, असे विधान करणारे तमिळनाडूचे मंत्री आणि मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे. बेंगळुरू येथील परमेश यांच्या तक्रारीवरून समन्स (समन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकरणात चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी देण्यात आलेली सूचना) बजावण्यात आले आहे. ४ मार्च या दिवशी होणार्या सुनावणीसाठी न्यायालयाने उदयनिधी यांना स्वतः उपस्थित रहाण्यास सांगितले आहे.
या संदर्भात परमेश यांचे अधिवक्ते धरमपाल म्हणाले की, उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला विरोध करणार्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. हे विधान सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. ते आपल्या विधानावर ठाम आहेत. त्यांना न्यायालयाला सामोरे जावे लागेल. अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाने हिंदु धर्माविषयी भक्ती आणि जागरूकता वाढली आहे. त्यामुळे अशा विधानांमुळे हिंदु धर्माचे पालन करणार्यांच्या आणि इतर काही धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जातात.