नरेंद्र मोदी यांचा वारसदार हा अधिक जहाल असेल !

प्रसिद्ध राजकीय विश्‍लेषक प्रशांत किशोर यांचा अनुमान

प्रसिद्ध राजकीय विश्‍लेषक प्रशांत किशोर

नवी देहली – आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे हळूहळू वाहू लागले आहे. अशातच प्रसिद्ध राजकीय विश्‍लेषक प्रशांत किशोर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारसदारावर वक्तव्य केले. किशोर म्हणाले की, हे कुणालाही ठाऊक नाही. कुणीही त्याविषयीचा अंदाज बांधायला नको. कसेही असले, तरी मोदी यांचा वारसदार त्यांच्यापेक्षा अधिक जहाल असेल. तो एवढा जहाल असेल की, तुलनेने मोदी त्याच्यापेक्षा अधिक मुक्त विचारांचे वाटू लागतील.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, भाजपचे सर्व मुख्यमंत्री आज त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक कट्टर हिंदुत्वनिष्ठ भासवण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदावर जो कुणी येईल, त्याला तसे वागण्याखेरीज दुसरा कुठला पर्यायच नसेल.

योगी आदित्यनाथ यांना मोदी यांच्या स्तरावर पोचायला पुष्कळ अवकाश !

योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भात ते म्हणाले की, मोदी आणि योगी यांच्यात अजूनही पुष्कळ अंतर आहे. ज्याप्रमाणे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांना वाजपेयी यांच्याविना स्वबळावर राज्यातील निवडणूक जिंकणे शक्य नव्हते, त्याप्रमाणेच योगीसुद्धा उत्तरप्रदेश विधानसभेत स्वबळावर बहुमत आणू शकत नाहीत. सध्या योगी आदित्यनाथ यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे; पण अजून त्यांना मोदी यांच्याएवढा स्तर गाठायला पुष्कळ अवकाश आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंसाठी कुणी आवाज उठवला किंवा त्यांच्या हितासाठी कार्य केले की, लगेच संबंधितांना ‘जहाल’ किंवा ‘कट्टर’ असे बिरूद लावून त्यांची प्रतिमा मलीन केली जाते. अशांचे वैचारिक खंडण आवश्यक !