स्वबळावर  लढणे  भाजपला लाभदायक ! – मंत्री रवींद्र चव्हाण

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर कार्यकारिणीची बैठक

रत्नागिरी – भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात  भाजपचा निष्ठावंत उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न चालू केले आहेत. याचाच एक भाग म्हणजे शहर कार्यकारिणीच्या बैठकीप्रसंगी रत्नागिरी दौर्‍यावर असलेल्या भाजपचे नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यामध्ये स्वबळावर लढणे भाजपला लाभदायक असून त्याकरता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.

माळनाका येथे जयेश मंगल पार्क येथे ही बैठक झाली. त्याप्रसंगी चव्हाण यांनी बूथप्रमुख, सुपर वॉरियर्स यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.

मंत्री रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की,

शत प्रतिशत भाजपच्या दिशेने जाण्याकरता नेतृत्वाने आदेश दिले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपमय वातावरण तयार करणे  महत्त्वाचे आहे. तुमच्यावर विश्वास ठेवणार्‍या १० घरांना भाजपचे झेंडे घरावर लावायला सांगा, व्यापारी लोकांना दुकानावर भाजपचा झेंडा फडकावयला सांगा. माझा परिवार भाजप परिवार असे म्हटले पाहिजे. युवकांची ताकद महत्त्वाची आहे. प्रत्येक बूथवर युवकांची अधिक संख्या दिसायला हवी.

या प्रसंगी माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले की, पक्षाने दिलेले सहप्रभारीपदाचे काम २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करणार आहे. सर्व बूथ, सुपर वॉरियर्सचे दायित्व पूर्ण होईल. रत्नागिरीत भाजपचा खासदार निवडून आला पाहिजे यासाठी आमची पूर्ण सिद्धता आहे. महाविजयासाठी आम्ही सज्ज आहोत.

या वेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, सचिन वहाळकर, सतेज नलावडे, प्रशांत डिंगणकर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.