प्रवाशांची जीवितहानी झाल्यास दोषी अधिकार्यांवर गुन्हा नोंदवण्याची सुराज्य अभियानाची मागणी
पेण – राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या रायगडमधील पेण-खोपोली महामार्गावरील भोगावती नदीवरील पुलाचे रेलिंग तुटले आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावरून रात्रीच्या वेळी जाणारी चारचाकी गाडी पुलावरून खाली पडली. सुदैवाने गाडीतील प्रवासी वाचले; परंतु भविष्यात पुन्हा अशी दुर्घटना घडल्यास आणि त्यामध्ये कुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला होत असलेली दिरंगाई नागरिकांच्या जिवावर बेतणारी ठरू शकते. त्यामुळे ‘पुलाच्या दुरुस्तीच्या कामात दिरंगाई करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आली आहे. ‘भोगावती पुलाच्या निकृष्ट कामाविषयी सुराज्य अभियानाकडून थेट मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रमांसह) एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे’, अशी माहिती सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरकटे यांनी दिली आहे.
१. काही मासांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून भोगावती नदीच्या पुलावरील लोखंडी रेलिंगचे काम करण्यात आले.
२. पुलाच्या डागडुजीसाठी ३५ लाख रुपये खर्चही करण्यात आले; मात्र त्यानंतरही पुलाची स्थिती अत्यंत बिकट आहे. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचेच हे द्योतक आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
३. सद्यःस्थितीत हा पूल धोकादायक आहे. वर्ष २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातच महाड येथे सावित्री नदीवरील पुलावरून एस्.टी.च्या गाड्या नदीत कोसळून ४० नागरिकांचा मृत्यू झाला होता.
४. भोगावती नदीच्या पुलावर पुन्हा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाचे तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (संरचनात्मक लेखापरीक्षण) करून दुरुस्ती करावी.
५. ‘पुलाचे काम होईपर्यंतच्या कालावधीत दुर्घटना घडून कुणाचा अपमृत्यू झाल्यास त्या प्रकरणी संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा, म्हणजेच भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा’, अशी मागणी सुराज्य अभियानाकडून करण्यात आल्याचे श्री. मुरकटे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकानागरिकांवर अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःहून पुलाची दुरुस्ती का करत नाही ? |