विक्रेती (सेल्स गर्ल) ते देशाच्या अर्थमंत्री असा प्रवास करणार्‍या भाजपच्या निर्मला सीतारामन कोण आहेत ?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांचा ६ वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा त्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या अर्थसंकल्प सादर करण्याविषयीच्या विक्रमाची (देसाई यांनी सलग ५ पूर्ण आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केले होते) बरोबरी करणार आहेत. निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत, ज्यांनी ५ पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. अशा निर्मला सीतारामन यांचा जीवनप्रवास या लेखाद्वारे येथे देत आहोत.

निर्मला सीतारामन

१. निर्मला सीतारामन यांची पार्श्‍वभूमी आणि शिक्षण

निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ या दिवशी तमिळनाडूतील एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेल्वेत काम करत असल्यामुळे वारंवार त्यांचे स्थानांतर होत असे. परिणामी निर्मलाजींचे शिक्षण वेगवेगळ्या शहरांमध्ये झाले. त्यांनी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’मध्ये) घेतले. त्यांनी ‘इंडो-युरोपियन कापड व्यापार’ या विषयात ‘पीएच्.डी.’ केली. तेथेच त्यांची डॉ. परकाला प्रभाकर यांच्याशी भेट झाली आणि पुढे त्यांच्याशी त्यांचे लग्न झाले. निर्मला सीतारामन यांचा राजकारणाशी पूर्वी कोणताही संबंध नव्हता.

२. लंडनमध्ये विक्रेती आणि अर्थशास्त्रज्ञाकडे साहाय्यक म्हणून केली नोकरी !

निर्मला सीतारामन यांचे पती शिक्षणासाठी लंडनला गेले, तेव्हा त्याही त्यांच्यासमवेत तिकडे गेल्या. या काळात निर्मला यांनी लंडनमधील ‘हॅबिटॅट सेंटर’मध्ये विक्रेती म्हणून काम केले आहे. त्यांनी ‘असोसिएशन ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीयर्स’मध्ये एका अर्थशास्त्रज्ञाकडे साहाय्यक म्हणूनही काम केले होते. त्यांनी ‘प्राईस वॉटर हाऊस’ नावाच्या आस्थापनात वरिष्ठ व्यवस्थापक म्हणूनही काम केले. त्यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी भाग्यनगरमधील (आंध्रप्रदेश) ‘सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी’ या संस्थेत उपसंचालक म्हणून काम केले.

३. राजकारणात प्रवेश आणि मंत्रीपद

डॉ. परकाला प्रभाकर यांचे आई-वडील प्रसिद्ध काँग्रेस राजकारणी होते; मात्र त्यांनी कधीही त्यांची विचारधारा स्वत:च्या मुलांवर लादली नाही. कौटुंबिक पार्श्‍वभूमी काँग्रेसची असूनही निर्मला सीतारामन यांनी वर्ष २००८ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. वर्ष २०१४ मध्ये जेव्हा केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले, त्यानंतर वर्ष २०१६ मध्ये त्यांना भारताच्या वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार), सप्टेंबर २०१७ मध्ये संरक्षण मंत्रीपद आणि वर्ष २०१९ मध्ये त्यांना पूर्णवेळ अर्थमंत्रीपदाचे दायित्व देण्यात आले.

४. निर्मला सीतारामन यांचे वेतन आणि संपत्ती

कॅबिनेट मंत्री म्हणून अर्थमंत्र्यांना प्रतिमास १ लाख रुपये वेतन मिळते. याखेरीज मतदारसंघ भत्ता ७० सहस्र, कार्यालय भत्ता ६० सहस्र रुपये आणि अतिथी भत्ता २ सहस्र रुपये आहे. यासमवेत बंगला, कर्मचारी, चारचाकी वाहन यांसारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे ९९ लाख ३६ सहस्र रुपयांचे घर आणि १६ लाखांहून अधिक रकमेची बिगर कृषी भूमी आहे. त्यांच्याकडे एक दुचाकी वाहन, ७ लाख ८७ सहस्र रुपयांचे सोने आणि ८० सहस्र रुपयांची चांदी आहे.

(साभार : विविध संकेतस्थळे)