Ladakh Dramatic Clash ChinaTroops : लडाखच्या मेंढपाळांची चीनच्या सीमेजवळ चिनी सैनिकांशी शाब्दिक चकमक !

लडाख – लडाखमधील काही मेंढपाळांची चीनच्या सीमेजवळ चिनी सैनिकांशी नुकतीच चकमक उडाली. हे मेंढपाळ मेंढ्या चरण्यासाठी या भागात आले होते. चिनी सैनिकांनी त्यांना रोखले, त्यानंतर मेंढपाळांनी त्यांना ‘आम्ही भारतीय भूमीवर उभे आहोत’ असे म्हणत चोख प्रत्युत्तर दिले.

सौजन्य टाइम्स नाऊ 

१. वर्ष २०२० मध्ये गलवान संघर्षानंतर, स्थानिक मेंढपाळांनी प्रथमच या भागावर दावा केला आणि चिनी सैनिकांना तेथून जाण्यास सांगितले. या संवादाचा व्हिडिओ समोर आला आहे. पूर्व लडाखमधील चुशूल येथील नगरसेवक कोन्चोक स्टॅन्जिन यांनी हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे.

२. त्यांनी म्हटले आहे, ‘आमच्या स्थानिक लोकांनी चिनी सैन्यांना त्यांचे शौर्य दाखवले आहे. ज्या भागात त्यांना प्रवेश करण्यापासून रोखले जात होते, ती आमच्या बंजारा जमातीची कुरणाची भूमी आहे’.

३. स्टॅन्जिन पुढे म्हणाले की, आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी देशाची दुसरी संरक्षक शक्ती म्हणून सदैव उभे राहिलेल्या बंजारा समाजाला मी सलाम करतो.

४. लडाखच्या सीमावर्ती भागात कुरणाच्या जमिनीवर अधिकार मिळवून देण्यासाठी भारतीय सैन्याने पशुपालकांना आणि भटक्या जमातीच्या लोकांना साहाय्य केल्याविषयी कोन्चोक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

५. १५ जून २०२० या दिवशी गलवानमध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. या वेळी चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते, तर चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाले होते.

संपादकीय भूमिका 

पूर्वीची पराभूत मानसिकता त्यागून राष्ट्रप्रेमाच्या नव्या उत्साहाने भारीत झालेले भारतीय आव्हाने स्वीकारण्यास सज्ज झाल्याचे हे द्योतक आहे !